प्रीमियम किंमत असूनही आयफोन 17 ठरला यावर्षी भारतात सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन
ॲपलच्या आयफोन 17 ची किंमत 82,900 रुपयांपासून सुरू होते, तरीही ग्राहकांनी त्याला मोठी पसंती दिली आहे.
नवीन स्मार्टफोन घेताना आपल्या मनात येणारा सर्वात सामान्य प्रश्न म्हणजे सध्या कोणत्या स्मार्टफोनची सर्वात जास्त क्रेझ आहे आणि कोणत्या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री होत आहे. या वर्षी भारतात सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोनच्या यादीत ॲपलच्या आयफोन 17 ने पहिले स्थान मिळवले आहे.
या फोनची किंमत 82,900 रुपयांपासून सुरू होते, म्हणजे तो प्रीमियम रेंजमध्ये येतो. किमतीवरून स्पष्टपणे दिसते की हा प्रीमियम स्मार्टफोन आहे. तरीही ग्राहकांनी तो मोठ्या प्रमाणात घेतला आहे आणि विक्रीच्या बाबतीत त्याने सर्व स्मार्टफोनना मागे टाकले आहे.
आयफोन 17 ने 4 टक्क्यांहून अधिक बाजारहिस्सा नोंदवला आहे. विशेष म्हणजे या यादीत असलेले इतर फोन बजेट फ्रेंडली किमतीतले होते. ओप्पो ए6 एक्स 5G आणि विवोच्या मॉडेल्सनीही यादीत वरचे स्थान मिळवले आहे. पण या सगळ्यांना मागे टाकून आयफोन 17 पुढे गेला.
फोन घेताना बहुतेक जण बजेटला सर्वात आधी प्राधान्य देतात. पण कधी कधी गरजा आणि आवड बजेटवर भारी पडतात आणि माणूस आपला ड्रीम फोन घेतो. आयफोन 17 च्या बाबतीतही असेच काहीसे झाले. या फोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.
फक्त आयफोन 17 च नाही, तर आयफोन 16 ची क्रेझही अजून कायम आहे. हे मॉडेल जुने असले तरी ग्राहक त्याला पसंती देत आहेत. यावरून दिसते की काही लोक नवे मॉडेल निवडतात, तर काही जण आपल्या बजेटनुसार जुने मॉडेल घेतात.
आयफोन 17 ला पसंती मिळण्याचे पहिले आणि मुख्य कारण म्हणजे तो या सिरीजमधला लेटेस्ट आणि स्वस्त आयफोन आहे. या सिरीजमधल्या प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेलच्या किमती यापेक्षा जास्त आहेत. शिवाय ईएमआय आणि एक्सचेंजचा वापर करून हा फोन घेतल्यास अधिक फायदा होऊ शकतो. बँक कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना जास्तीचे डिस्काऊंटही दिले जाऊ शकते.
दुसरे कारण म्हणजे तुमच्याकडे मॅक, एप्पल वॉच किंवा एअरपॉड असेल, तर हा आयफोन त्या डिव्हाईसशी अगदी सहज कनेक्ट करता येतो. कॅमेरा आणि सॉफ्टवेअर अपडेटमुळेही लोक आयफोन 17 घेण्याला प्राधान्य देत आहेत.
ज्या यूजर्सना नवा कॅमेरा, स्मूद स्क्रीन आणि एप्पल डिव्हाईससोबत आयफोन वापरायचा आहे, त्यांच्यासाठी आयफोन 17 हा चांगला पर्याय ठरणार आहे.