अल्ट्रा लिंकसह इन्फिनिक्स स्मार्ट 20 एचडी भारतात, किंमत 10,999 रुपये
नेटवर्क नसतानाही सुमारे 200 मीटरपर्यंत कॉल आणि मेसेज करता येणारे अल्ट्रा लिंक फीचर असलेला इन्फिनिक्स स्मार्ट 20 एचडी भारतात दाखल झाला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारतीय स्मार्टफोन बाजारात सध्या टेक कंपन्यांचा भर बजेट स्मार्टफोन लाँच करण्यावर दिसत आहे. महागाई वाढत असल्यामुळे ग्राहक कमी किमतीत दमदार फीचर्स देणारा फोन शोधत असतात. याच पार्श्वभूमीवर इन्फिनिक्स कंपनीने आपला नवा स्मार्ट 20 एचडी स्मार्टफोन भारतात आणला आहे. हा फोन कंपनीच्या स्मार्ट 20 सिरीजमध्ये सहभागी होणार आहे.
किमतीचा विचार केला तर सर्व ऑफर्सनंतर या फोनची किंमत 10,999 रुपये होणार आहे. ही किंमत 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज या व्हेरिअंटसाठी आहे. खरेदीवर कंपनी 6 महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआय पर्यायही देणार आहे. हा स्मार्टफोन सनलाइक ऑरेंज, सिल्व्हर डान्सर आणि नाईट पल्स या तीन रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे.
या फोनचे सर्वात वेगळे फीचर म्हणजे अल्ट्रा लिंक. हे फीचर ब्लूटूथवर आधारित कनेक्टिव्हिटी वापरते. त्यामुळे मोबाईल नेटवर्क नसतानाही सुमारे 200 मीटरपर्यंत कॉल, मेसेज, व्हॉईस नोट आणि फोटो पाठवता येणार आहेत. म्हणजेच नेटवर्कशिवायही ही सर्व कामे या फीचरमुळे करता येतील. याशिवाय प्युअर व्हॉईस टेक्नोलॉजीसह तीन नॉइज कँसलेशन मोडही फोनमध्ये मिळणार आहेत.
डिस्प्लेबद्दल सांगायचे तर इन्फिनिक्स स्मार्ट 20 एचडीमध्ये 6.67 इंचाचा एचडी प्लस पंच-होल डिस्प्ले दिला आहे. त्याला 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळणार आहे. डिस्प्लेची पीक एचबीएम ब्राइटनेस 700 निट्सपर्यंत आहे.
परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये यूनिसॉक टी 7250 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने रॅम 6GB पर्यंत वाढवता येऊ शकते, तर मायक्रोएसडी कार्डने स्टोरेज वाढवता येईल. फोनमध्ये अँड्रॉईड 15 वर आधारित एक्सओएस 15.1 मिळणार आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीत फोनच्या मागील आणि समोरील, अशा दोन्ही बाजूंना 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. रिअर कॅमेऱ्यात ऑटोफोकस मिळणार असून तो 2K रिझोल्यूशनमध्ये 30fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. सुपर नाईट, ड्युअल व्हिडिओ, व्लॉग, डॉक्युमेंट्स, प्रो, पॅनोरमा आणि टाईम-लॅप्स अशा मोडमध्येही रेकॉर्डिंग करता येईल.
बॅटरीसाठी फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी असून ती 15W चार्जिंग सपोर्टसह येते. बॉक्समध्ये मात्र 10W चार्जर मिळणार आहे. फोनमधील डुअल स्पीकर 300 टक्क्यांपर्यंत अल्ट्रा व्हॉल्यूम मोड आणि डीटीएस ऑडिओला सपोर्ट करतात.