इंदापूरच्या पश्चिम भागात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंपाच्या मोटारी, केबल आणि डाळिंबाची चोरी, शेतकरी हवालदिल
निरा नदीच्या काठावरील परिसरात मोटारी आणि केबल चोरीच्या घटना वाढल्या आहेत; वालचंदनगर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात, निरा नदीच्या काठावरील परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या मोटारी आणि विजेच्या केबल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सततच्या या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती आणि चिंता आहे. जांब आणि आजूबाजूच्या भागात मोटारी व केबल चोरीचे प्रकार एकापाठोपाठ एक घडत असल्याचे समोर येत आहे.
यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. त्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतीसाठी अतिशय गरजेच्या असलेल्या मोटारी आणि केबल चोरीला गेल्यामुळे पिकांना होणारे पाणी पूर्णपणे बंद झाले आहे. शेतीचा सगळा दारोमदार पाण्यावर असताना पंपच नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
जांब हे वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाव असून परिसरातील मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. या भागातील दिलीप कवळे, विश्वास पाटील, नामदेवराव रुपनवर, बापूराव मानकर, चव्हाण यांच्यासह साधारण २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या महागड्या कॉपर वायर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी लंपास केल्या. या घटनेनंतर जांब परिसरात केबल आणि मोटार चोरीच्या आणखी अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
याशिवाय, काही दिवसांपूर्वीच जवळच्या निरवांगी परिसरातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बागेतील लाखो रुपयांचे डाळिंब अज्ञात चोरट्यांनी रात्रीत चोरून नेले. ही घटनाही अजून ताजी आहे. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत.
वारंवार होणाऱ्या या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी वालचंदनगर पोलिसांनी ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी परिसरातील शेतकऱ्यांची जोरदार मागणी आहे. चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, असेही शेतकरी म्हणत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या चोरीला गेलेल्या मोटारी आणि केबलचा तातडीने शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.