साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरण पेटलं, IIT मुंबईबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात
साहिल वाकोडेला न्याय मिळावा यासाठी झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने IIT मुंबईबाहेर आंदोलन केलं, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
मुंबईतील IIT मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतलं आहे. साहिलला न्याय मिळावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसने IIT मुंबईच्या बाहेर जोरदार आंदोलन केलं. हे आंदोलन युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.
साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर IIT मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन आधीपासूनच सुरू आहे. विद्यार्थ्यांनी अनेक मागण्या मांडल्या असून त्यात संस्थेची जबाबदारी निश्चित करणं, मानसिक आरोग्यासाठीच्या सुविधा आणि तक्रार निवारण व्यवस्थेत सुधारणा या मुद्द्यांचा समावेश आहे. IIT मुंबई प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या 18 मागण्यांवर चर्चा केली असून त्यावर पुढील प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. साहिल वाकोडेला न्याय मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. 'जब जब सरकार डरती है, पुलिस को आगे करती है' अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. आंदोलन सुरू असतानाच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.
झीनत शबरीन यांनी साहिल वाकोडे प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या 18 मागण्यांना युवक काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय IIT मुंबईमध्ये जातीय भेदभावाच्या आरोपांचीही स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. साहिलच्या कुटुंबीयांनी संस्थेत जातीय भेदभाव आणि छळ केल्याचे आरोप केले आहेत, मात्र अशा तक्रारी यापूर्वी संस्थेकडे करण्यात आल्याचं IIT मुंबईने नाकारलं आहे. त्यामुळे या परस्परविरोधी दाव्यांची चौकशी होणं महत्त्वाचं ठरणार आहे.
युवक काँग्रेसने प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शबरीन यांनी त्यांना सेवेतून बरखास्त करण्याची स्पष्ट मागणी केली. दुल्ला यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त असून IIT मुंबईने त्यांचं डीनपद निलंबित केलं आहे. मात्र विद्यापीठातील फॅकल्टीच्या एका गटाने दुल्ला यांना पाठिंबा दिला असून आरोपांची योग्य पद्धतीने चौकशी व्हावी अशी भूमिका घेतली आहे.
साहिल वाकोडे प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि पुढे काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, युवक काँग्रेसने साहिलला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.