नागपुरात हीट अँड रन, गाडीच्या धडकेने चार वर्षांचा मुलगा जखमी
कळमना भागातील शिक्षक कॉलनीत हा प्रकार घडला, पोलिसांनी कारवाई न केल्याने संतप्त नागरिकांनी रात्री कळमना पोलीस स्टेशनला घेराव घातला.
शहर पोलिसांनी कितीही कडक भूमिका घेतली तरी हीट अँड रनच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत, याचा प्रत्यय नागपुरात पुन्हा एकदा आला. कळमना भागातील शिक्षक कॉलनीत एका तरुणीने चालवलेल्या कारने घराच्या व्हरांड्यात खेळणाऱ्या चार वर्षांच्या मुलाला जोरदार धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला. आरोपी तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने संतापलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी रविवारी रात्री कळमना पोलीस स्टेशनला घेराव घातला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
शिक्षक कॉलनीत राहणारे सचिन देशमुख यांचा चार वर्षांचा मुलगा शिवांश 23 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता घराच्या व्हरांड्यात खेळत होता. त्यावेळी कॉलनीतील इतर मुलंही घरासमोर खेळत होती. हे बघून शिवांशही खेळत खेळत घराच्या गेटजवळ येऊन खेळू लागला. नेमक्या त्याचवेळी एमएच/49/डीए/0744 क्रमांकाची कार त्या रस्त्याने जात होती. कार एक तरुणी चालवत होती, तिच्या शेजारी तिची मैत्रीण बसली होती. या तरुणीने शिवांशला जोरदार धडक दिली, त्यामुळे तो लांब जाऊन पडला. या धडकेत त्याच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले आणि त्यांनी कार अडवली. त्याच कारमधून शिवांशला पारडी येथील भवानी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचताच ती तरुणी कारमधून उतरून पळून गेली. शिवांशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आरोपी तरुणीचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये पोहोचले, मात्र तरुणीने अपघाताबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. शिवांशच्या कुटुंबीयांनी कळमना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. दरम्यान आरोपी तरुणीचे कुटुंबीय शिवांशच्या कुटुंबीयांना शांत राहण्याचा सल्ला देऊ लागले.
कळमना पोलिसांनी कारवाईत ढिलाई दाखवल्याने रविवारी रात्री शिवांशचे कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी कळमना पोलीस स्टेशनला घेराव घातला. पोलिसांनी कडक कारवाई न केल्यामुळे आरोपी तरुणीच्या कुटुंबीयांची भीती संपली असून ते उलट शिवांशच्या कुटुंबीयांनाच धमकावत असल्याचे आणि आपले कोणीही काही बिघडवू शकत नाही, अशी भाषा वापरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. रात्री 11 ते 2 या वेळेत नागरिकांनी कळमना पोलीस स्टेशनला घेराव घातला आणि आरोपी तरुणी व तिच्या कुटुंबीयांवर कारवाईची मागणी केली. कळमना पोलिसांनी मात्र कारवाईत ढिलाई केल्याचा आरोप फेटाळला असून, मुलाच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला तडजोड करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच सुरुवातीला तक्रार दाखल झाली नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.