सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:52 IST

गुगलचे भारतासाठी नवे एआय उपक्रम: छोटे उद्योग, शेतकरी आणि शिक्षकांना मदत

गुगलने भारतातील लहान व्यवसाय, शेतकरी आणि शिक्षकांसाठी नवीन एआय-आधारित उपक्रमांची घोषणा केली आहे.

गुगलचे भारतासाठी नवे एआय उपक्रम: छोटे उद्योग, शेतकरी आणि शिक्षकांना मदत छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दिल्ली: गुगलने भारतातील लहान व्यवसायांना कर्ज मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देण्यासाठी आणि कृषी तज्ज्ञांचे काम सोपे करण्यासाठी नवीन एआय-आधारित उपक्रमांची घोषणा केली आहे. व्यक्ती आणि लहान व्यवसायांच्या गरजा भागवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर वाढवणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

या उपक्रमांतर्गत 'गूगल डॉट ओआरजी' भारतातील एमएसएमई क्षेत्रासाठी काम करणाऱ्या एका संस्थेला १५ दशलक्ष डॉलर्स देणार आहे. या अनुदानातून अशी एआय साधने विकसित केली जातील, जी मोठ्या प्रमाणावर वापरता येतील.

भारतात ९० दशलक्षांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आहेत. त्यांत ३४५ दशलक्षांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. तरीही लहान व्यावसायिकांना कर्ज मिळवणे, नवीन बाजारपेठांत पोहोचणे आणि सरकारी नियमांचे पालन करणे अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. नव्या साधनांमुळे औपचारिक कर्ज मिळवणे, नवीन ग्राहक आणि बाजारपेठा शोधणे आणि नियमांचे पालन करणे सोपे होईल, असे सांगण्यात आले आहे.

शिक्षकांच्या बाबतीत गुगलचे म्हणणे आहे की, एआयमुळे शिक्षक आणि तज्ज्ञांचे रोजचे काम सोपे होऊ शकते आणि त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी व मार्गदर्शनासाठी जास्त वेळ मिळू शकतो. या उद्देशाने कंपनीने यावर्षी मे महिन्यात भारतात 'गूगल एआय एज्युकेटर सिरीज' सुरू केली. या कार्यक्रमात शिक्षकांना जेमिनी आणि जेमिनी नोटबुक यांसारखी एआय साधने कशी वापरायची, हे शिकवले जाते. ही साधने पाठांचे नियोजन करण्यात, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अभ्यास साहित्य तयार करण्यात आणि रोजच्या तयारीवर जाणारा वेळ वाचवण्यात मदत करतात.

कृषी क्षेत्रातही एआयचा वापर वाढवण्यासाठी गूगल काम करत आहे. भारतीय गरजा लक्षात घेऊन कंपनीने आपले 'ॲग्रीकल्चरल अंडरस्टँडिंग मॉडेल' विकसित केले आहे, जे शेतीविषयक माहिती पुरवते. ही मॉडेल्स आता भारतात आणि इतर ११ देशांमध्ये वापरली जात आहेत. गुजरातमध्ये गुगलच्या कृषी मॉडेलचा एपीआय राज्य सरकारच्या 'कृषी प्रगती क्रॉप इंटेलिजन्स' प्लॅटफॉर्मशी जोडण्यात आला आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात या प्रणालीमार्फत ६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ९० कोटींहून (९०० दशलक्ष) अधिक एसएमएस सूचना पाठवण्यात आल्या. या संदेशांत पीक आणि जमिनीचे आरोग्य, कीड व रोग प्रतिबंध आणि हवामानातील बदल यांची माहिती दिली जाते. ही प्रणाली १ कोटी ४० लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरील शेतीविषयक निर्णयांना मदत करत असल्याचेही कंपनीचे म्हणणे आहे. पिकांचे उत्पन्न वाढवणे आणि शेतकऱ्यांना आपले उत्पन्न अधिक चांगल्या प्रकारे सांभाळण्यात मदत करणे, हा याचा उद्देश आहे.

याशिवाय एकस्टेप फाउंडेशनच्या नेतृत्वाखालील जागतिक संघ असलेल्या ओपनॲग्रीनेटने गुगलचे एपीआय आपल्या कृषी विश्लेषण डॅशबोर्डमध्ये समाविष्ट केले आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ