गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता: दादासाहेब फाळके चित्रनगरीपर्यंतचा उड्डाणपूल 15 ऑक्टोबरला खुला होणार
गोरेगाव ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानच्या 1.26 किलोमीटर उड्डाणपुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून पश्चिम-पूर्व उपनगरांतील प्रवासाचा वेळ 75 वरून 25 मिनिटांवर येणार आहे.
पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (GMLR) या मोठ्या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. गोरेगाव ते दादासाहेब फाळके चित्रनगरी या दरम्यानच्या 1.26 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं असून हा पूल 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी अलीकडेच प्रत्यक्ष प्रकल्पस्थळावर जाऊन कामाची पाहणी केली आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला. दिंडोशी कोर्ट ते दादासाहेब फाळके चित्रनगरी या पट्ट्यात 3x3 मार्गिकांचा हा पूल उभारला जात असून त्याचं मुख्य बांधकाम पूर्णपणे झालं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या पुलाची भार चाचणी म्हणजेच लोड टेस्ट घेतली जाणार आहे.
एकूण 12.20 किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण GMLR प्रकल्पामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होईल आणि नागरिकांना जलद, सुलभ आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था मिळेल, असं महापालिकेचं म्हणणं आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही उपनगरांमधला प्रवासाचा वेळ सध्याच्या 75 मिनिटांवरून थेट 25 मिनिटांवर येणार आहे. याशिवाय इंधनाची बचत होईल आणि मुंबईच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात म्हणजे AQI मध्येही सुधारणा अपेक्षित आहे. एकूणच मुंबईकरांचं राहणीमान सुधारण्याच्या दृष्टीने महापालिकेचा हा एक मोठा उपक्रम मानला जात आहे.
पुलाची सुरुवात दिंडोशी कोर्टपासून होते. पुढे रत्नागिरी जंक्शन हॉटेलजवळ हा पूल वळण घेतो आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीजवळ खाली उतरतो. एका खांबावर आधारित पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रीटच्या सेगमेंटल बॉक्स गर्डर पद्धतीने या पुलाचं बांधकाम करण्यात आलं आहे.
पुलाचं मुख्य बांधकाम शंभर टक्के पूर्ण झालं असून त्यात एकूण 31 खांब आणि 30 स्पॅन उभारण्यात आले आहेत. खांबांवर तुळई बसवण्याचं काम, डेक स्लॅबचं ओतकाम आणि पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच रस्त्यांचं काम आधीच पूर्ण झालं आहे. आता उरलेल्या कामांमध्ये रंगकाम, दिशादर्शक फलक उभारणे, विजेचे खांब बसवणे, थर्मोप्लास्टिक मार्किंग, कॅट्स आयज आणि आवाज रोखणारे बॅरियर बसवण्याची कामं सुरू आहेत.
पुलाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वाहतुकीसाठीची क्षमता तपासण्यासाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भार चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी पार पडल्यानंतर आवश्यक त्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून हा पूल 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन महापालिकेने केलं आहे.