मुंबईच्या गोरेगावमध्ये सार्वजनिक शौचालयात दोन तरुणांचा मृत्यू; रासायनिक वायूमुळे मृत्यू झाल्याचा संशय
मुंबईच्या गोरेगाव भागातील राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात दोन तरुणांचा मृत्यू झाला. शौचालयाशेजारी असलेल्या रासायनिक कारखान्यातून पसरलेल्या वायूमुळे हा मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मुंबईच्या गोरेगाव भागातील राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृणालताई गोरे उड्डाणपुलाजवळ असलेल्या या शौचालयात सकाळी 8.30 वाजता ही घटना घडली असे सांगण्यात येते. मृत तरुणांची नावे प्रभाकर धनिवार (वय 24) आणि भाविन देसाई (वय 18) अशी आहेत.
घटना घडल्यानंतर दोघांनाही गोरेगाव येथील ट्रामाकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. या तरुणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी रासायनिक वायूमुळे हा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
शौचालयाच्या अगदी शेजारीच एक रासायनिक कारखाना असल्याची माहिती समोर येत आहे. या कारखान्यात अॅसिड आणि इतर रासायनिक पदार्थांचा वापर होत असल्याचे सांगितले जाते. शौचालयाच्या आतमध्ये रासायनिक वास पसरल्यानंतर आतमध्ये कोंडलेल्या या दोघांना त्रास होऊ लागला असावा आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस, रुग्णवाहिका, MPCB आणि BMC च्या पथकांनी धाव घेतली. या सर्व यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मृत्यूचे नेमके कारण काय आणि शौचालयात नेमका कोणता रासायनिक पदार्थ पोहोचला, याचा तपास सध्या सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौचालयाच्या बाजूला गटार लाईन आहे आणि याच गटाराला लागून एक छोटा इलेक्ट्रोप्लेटिंगचा कारखाना आहे. या कारखान्यातील केमिकलच्या वासामुळे दोन्ही तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दोन तरुणांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. आमच्या भागात 60 कुटुंबे राहतात, अशा वसाहतीत रासायनिक कंपनी चालवली कशी जाते, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने या रासायनिक कंपनीवर कारवाई करावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
या घटनेची दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधी रविंद्र वायकर यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणीनंतर दोषींवर कडक कारवाई व्हावी, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.