मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:52 IST

गोंडपिपरी येथील किराणा दुकानाला आग, ९ ते १० लाखांचे नुकसान

चंद्रपूर जिल्ह्यातील फुर्डीहेटी गावात किराणा दुकानाचे कुलूप तोडून आग लावल्याचा संशय, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

गोंडपिपरी येथील किराणा दुकानाला आग, ९ ते १० लाखांचे नुकसान
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील फुर्डीहेटी गावात एका किराणा दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अज्ञात इसमाने दुकानाचे कुलूप तोडून आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आगीत दुकानातील किराणा सामान, फर्निचर, टीव्ही, कुलर यासोबतच रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रेही जळून खाक झाली.

फुर्डीहेटी येथील रहिवासी संघराज केशव तेलसे (वय ५०) हे आपल्या कुटुंबासह गावात राहतात आणि शेतीसोबत जोडधंदा म्हणून हे किराणा दुकान चालवतात. त्यांच्या भाच्याच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी ते १८ सप्टेंबर २०२६ रोजी कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरला गेले होते. ते बाहेरगावी असताना त्यांच्या पश्चात घरी त्यांची ५० वर्षीय आई जिजाबाई केशव तेलसे या दुकान सांभाळत होत्या.

२० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास जिजाबाई काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता त्यांना दुकानाच्या शटरमधून धूर येताना दिसला. हा धूर पाहताच त्यांनी लगेच आरडाओरड केली, त्यामुळे आसपासचे शेजारी आणि नातेवाईक धावून आले. सर्वांनी मिळून दुकानाजवळ जाऊन पाहणी केली असता, उजव्या बाजूच्या शटरचे कुलूप तोडलेले आणि शटर अर्धवट उघडलेले आढळून आले. दुकानाच्या आत भीषण आग लागल्याचे लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी तातडीने गोंडपिपरी येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दुकानातील सगळे साहित्य जळून गेले होते.

घटनेची माहिती मिळताच दुकानमालक संघराज तेलसे २१ सप्टेंबरला रात्री गावात परत पोहोचले आणि त्यांनी दुकानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या आगीत सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे किराणा सामान जळाले. याशिवाय दीड ते दोन लाख रुपयांचे फर्निचर, टीव्ही व कुलर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तसेच दुकानातील ३० ते ५० हजार रुपयांची रोकड आणि दुकानाचे वहीखाते व परवाना हे महत्त्वाचे कागदपत्रही जळून नष्ट झाले. या घटनेत एकंदर ९ ते १० लाख रुपयांच्या घरात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

चोरीच्या उद्देशाने किंवा वैमनस्यातून अज्ञात इसमाने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संघराज तेलसे यांच्या तोंडी तक्रारीवरून गोंडपिपरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ३२४(५), ३२६(एफ) आणि ३३२(सी) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ