गोंदिया आत्महत्या प्रकरण: डिलीट डेटामुळे तपासाला वळण, पोलिस कर्मचाऱ्यासह प्रियकरावर गुन्हा
तीन वर्षांपूर्वी झालेल्या १८ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात मोबाईलमधील डिलीट डेटा मिळाल्यानंतर तपासाला नवी दिशा मिळाली असून, प्रियकर आणि एका पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या एका तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. तरुणीच्या मोबाईलमधून डिलीट झालेला डेटा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या तपासणीत परत मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर आणि त्यावेळी पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे चिचगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या १८ वर्षीय तरुणीचं एका तरुणासोबत प्रेमसंबंध होतं. दोघांमध्ये काही कारणांवरून वारंवार भांडणं होत असल्याचं तिच्या मोबाईलमधील संभाषणातून तपासात समोर आलं आहे. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी साधारण १.३० वाजता तरुणीनं स्वतःच्या घरात अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतलं होतं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
हे प्रकरण उघडकीस आल्यापासून तरुणीच्या वडिलांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सातत्यानं केली होती. दरम्यानच्या काळात तपास सुरू असताना तरुणीच्या मोबाईलमधून डिलीट करण्यात आलेला डेटा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून पोलिसांना मिळाला. या डेटामध्ये सापडलेलं व्हाट्सऐप संभाषण आणि इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनाक्रम पुन्हा पडताळून पाहायला सुरुवात केली. या पडताळणीत तरुणीच्या वैयक्तिक आयुष्यात एका पोलिस कर्मचाऱ्यानं हस्तक्षेप केल्याचा आरोप पुढे आला.
तपासानुसार, त्या वेळी देवरी येथील नक्षल गोपनीय शाखेत कार्यरत असलेला पोलिस कर्मचारी ओमप्रकाश जामनिक यानं तरुणीला अश्लील स्वरूपाचे मेसेज पाठवल्याचा आणि अनुचित मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळेच तरुणी आणि तिच्या प्रियकरामध्ये वाद वाढत गेला, असं तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या आरोपांची कायदेशीर सत्यता पुढील तपासात स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी चिपोटा, ता. देवरी येथील विकेश अंबादे आणि सध्या अकोला येथे राहणारा पोलिस कर्मचारी ओमप्रकाश जामनिक यांच्याविरुद्ध चिचगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन हेगडकर यांच्या तक्रारीवरून विकेश अंबादे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६, ५०४ आणि ५०६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे, तर जामनिक याच्याविरुद्ध कलम ३५४(अ) आणि ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तीन वर्षांनंतर हाती लागलेल्या मोबाईल डेटामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून, उपलब्ध डिजिटल पुराव्यांसह इतर बाबींची पडताळणी पोलिसांकडून सध्या सुरू आहे.