भारताच्या नेमबाज वाघिणींची जपानमध्ये डरकाळी, ५० मीटर रायफल प्रकारात रौप्यपदक
एशियन गेम्स २०२६ स्पर्धेत भारताच्या महिला नेमबाजांनी सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले.
जपानमध्ये सध्या एशियन गेम्स २०२६ ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताने अनेक क्रीडा प्रकारांमध्ये चांगली कामगिरी करत पदके जिंकली आहेत. याच स्पर्धेत नेमबाजी प्रकारातही भारतीय महिला नेमबाजांनी आपली चमक दाखवली असून भारतासाठी आणखी एक पदक मिळवले आहे. महिलांच्या ५० मीटर रायफल ३-पोझिशन सांघिक प्रकारात तिलोत्तमा सेन, विदरसा विनोद कोचलुमकल आणि आशी चौकसे या तिघींनी मिळून रौप्यपदकाला गवसणी घातली.
हा प्रकार तसा सोपा नाही. यात नीलिंग म्हणजे गुडघ्यावर टेकून, प्रोन म्हणजे पोटावर झोपून आणि स्टँडिंग म्हणजे उभे राहून अशा तीन वेगवेगळ्या पोझिशन्समध्ये नेम धरावा लागतो. या तिन्ही पोझिशन्समध्ये भारताच्या तिन्ही खेळाडूंनी उत्तम ताबा आणि कौशल्य दाखवले, आणि त्यामुळेच भारताला हे पदक मिळवता आले.
तिलोत्तमा, विदरसा आणि आशी या तिघींनी एकत्रित १७६३ पॉईंट्स मिळवत दुसरे स्थान पटकावले. या प्रकारात चीनने सुवर्णपदक पटकावले, तर कझाकिस्तानने १७५४ पॉईंट्ससह तिसरे स्थान मिळवत कांस्यपदकावर नाव कोरले.
याआधी झालेल्या पात्रता फेरीत तिलोत्तमा सेनने ५९० पॉईंट्स नोंदवत तिसरे स्थान मिळवले, तर विदरसा विनोदने ५८८ पॉईंट्ससह सहावे स्थान मिळवले. या कामगिरीच्या जोरावर दोघींनीही वैयक्तिक प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. आशी चौकसेनेही ५८५ पॉईंट्ससह चांगली लढत दिली, मात्र वैयक्तिक अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी तिचे गुण थोडक्यात कमी पडले, त्यामुळे तिला त्या फेरीत स्थान मिळाले नाही.
स्पर्धेच्या सुरुवातीला नीलिंग पोझिशनमध्ये विदरसाला काहीशी अडचण आली. सुरुवातीचे काही शॉट्स चुकल्याने तिच्या एकूण पॉईंट्सवर परिणाम झाला. मात्र त्यानंतर प्रोन आणि स्टँडिंग या दोन्ही टप्प्यांमध्ये तिने अचूक नेम साधत जोरदार पुनरागमन केले. दुसरीकडे, तिलोत्तमा आणि आशी चौकसे यांनी सुरुवातीपासूनच अव्वल खेळाडूंमध्ये स्थान राखत भारताची आघाडी कायम ठेवली होती. या तिघींच्या एकत्रित कामगिरीमुळेच भारताला या प्रकारात रौप्यपदक मिळवता आले.
सांघिक प्रकारातील या रौप्यपदकामुळे भारतीय नेमबाजांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. आता सर्वांच्या नजरा तिलोत्तमा सेन आणि विदरसा विनोद यांच्या इंडिविज्युअल फायनलवर लागल्या आहेत. दोघींचा सध्याचा फॉर्म पाहता त्या भारतासाठी आणखी एक पदक जिंकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.