४४ वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाला एशियन गेम्समध्ये सुवर्ण, फायनलमध्ये चीनवर १-० ने मात
एशियन गेम्स 2026 च्या फायनलमध्ये भारताने चीनचा 1-0 असा पराभव केला आणि 2028 च्या ऑलिम्पिकचे थेट तिकिटही मिळवले.
एशियन गेम्स 2026 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे. तब्बल 44 वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत महिला हॉकीचे सोनं मिळाले. फायनलमध्ये भारताने चीनचा 1-0 असा पराभव केला. संघाने सर्वोत्तम कामगिरी करत हे सुवर्ण पदक भारताच्या झोळीत टाकले.
या विजयामुळे भारताने ऑलिम्पिकचे तिकिटही मिळवले आहे. लॉस अँजिल्समध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाला थेट प्रवेश मिळाला आहे.
भारतीय महिला संघाने एशियन गेम्समध्ये शेवटचे सुवर्ण पदक 1982 साली जिंकले होते. त्यानंतर 1998 मध्ये संघाला रौप्य पदक मिळाले, तर 2018 मध्येही संघ फायनलमध्ये पोहोचला होता. यंदा मात्र संघाची कामगिरी शानदार ठरली.
फायनल सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच चीनवर दबाव ठेवला. भारतीय संघ सतत हल्ले करत होता आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला. सहाव्या मिनिटाला बलजीत कौर हिला ग्रीन कार्ड मिळाले. मात्र 10 व्या मिनिटाला लालरेम्सियामी हिने गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. आपला 200 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी त्या मैदानात उतरल्या होत्या.
त्यानंतर भारताला आघाडी दुप्पट करण्याची संधी होती, पण पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. तरीही भारताच्या भक्कम डिफेन्समुळे आघाडी टिकून राहिली.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये चीनने पुनरागमनाचा प्रयत्न केला आणि आक्रमक खेळ केला. चीनला पेनल्टी स्ट्रोकही मिळाले, पण सविता पूनिया हिने दमदार बचाव करून चीनला बरोबरी करू दिली नाही. त्यानंतरही चीनचा आक्रमक खेळ सुरूच राहिला, पण भारताच्या डिफेन्सला त्यांना भेदता आले नाही.
तिसऱ्या आणि चौथ्या क्वॉर्टरमध्येही भारतीय डिफेन्सने सातत्याने चांगला खेळ केला आणि चीनला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये कर्णधार सलीमा टेटे दुखापतग्रस्त झाली, तरीही भारताने चीनला वरचढ होऊ दिले नाही. चौथ्या क्वॉर्टरमध्ये सलीमा पुन्हा मैदानात परतली आणि तिच्या नेतृत्वात संघाने आपला दबदबा कायम ठेवत सुवर्ण पदक पटकावले.