लिव्ह-इनमधून जन्मलेल्या एका महिन्याच्या बाळाचे तीन व्यवहार; ४८ तासांत चार जणांच्या हातांतून तेलंगणापर्यंत नेले
छत्रपती संभाजीनगर येथे अवघ्या एका महिन्याच्या बाळाची पैशांसाठी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जन्मानंतर आई-वडिलांच्या कुशीत सुरक्षित राहायला हवे असलेल्या या बाळाचा व्यवहार झाला, असे पोलीस तपासात पुढे आले आहे.
हे बाळ लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मले होते. जन्मदात्यांनीच बाळाचा सौदा केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दलालांच्या माध्यमातून बाळाचे आणखी व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अवघ्या ४८ तासांत बाळ चार जणांच्या हातांतून फिरल्याची माहिती आहे.
पोलीस तपासानुसार, बाळाच्या पहिल्या व्यवहारात १ लाख २० हजार रुपये देण्यात आले. या पैशांतून महागडे मोबाईल आणि सोन्याचे दागिने खरेदी करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येते. पण पहिल्या व्यवहारानंतरही बाळाची विक्री थांबली नाही.
बाळाला एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात आले आणि त्यानंतर त्याची किंमत वाढत गेली. या प्रकरणात बाळाचे एकूण तीन व्यवहार झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यातील एका व्यवहारात तब्बल ३ लाख ७० हजार रुपयांची रक्कम असल्याचे दिसून आले आहे.
बाळाला छत्रपती संभाजीनगरहून नांदेडमार्गे थेट तेलंगणापर्यंत नेण्यात आले. ५०० किलोमीटरहून अधिक अंतराचा हा प्रवास अवघ्या दोन दिवसांत झाल्याचे तपासातून पुढे आले आहे. या काळात बाळाचा ताबा वारंवार बदलला गेला. जन्मानंतर अवघ्या एका महिन्यातच ते वेगवेगळ्या लोकांकडे सोपवले गेले. या सगळ्या प्रकारामुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी बाळाच्या विक्रीत सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या व्यवहारातून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि इतर वस्तू खरेदी केल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांनी बाळाला सुरक्षितपणे परत आणले. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार बाळाला संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
बाळाच्या विक्रीत नेमके कोण कोण सहभागी होते, व्यवहारात किती जणांचा सहभाग आहे आणि या प्रकरणामागची संपूर्ण साखळी काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. बाळाची विक्री करणारे आणि व्यवहारात सहभागी असलेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.