एक कोटीच्या रकमेवरून तीन भावांत जुंपली; 'अफरातफरी' सिनेमाचा ट्रेलर आला, ९ ऑक्टोबरला रिलीज
'अफरातफरी' या मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला असून एक कोटी रुपयांसाठी तीन भावांमध्ये रंगणारा गोंधळ त्यात दाखवला आहे. सिनेमा ९ ऑक्टोबरला थिएटरमध्ये येणार आहे.
एक कोटी रुपयांची रक्कम समोर आली की नात्यांमधलं गणितही बदलू शकतं, आणि हीच रक्कम जर तीन भावांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनली तर घोळ होणारच. असाच भन्नाट गोंधळ मांडणाऱ्या 'अफरातफरी' या मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. पैशांचा मोह, गैरसमज, वेगवेगळ्या युक्त्या आणि तीन भावांची चाललेली धावपळ ट्रेलरमध्ये दिसते, त्यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
ट्रेलरमध्ये एक कोटी रुपये मिळवण्यासाठी तीन भाऊ कोणकोणते डाव खेळतात, याची झलक दिसते. एका बाजूला मोठी रक्कम मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रत्येक जण वेगळी खेळी करताना दिसतो. पैशांच्या हव्यासापायी तिघांमध्ये नेमकं काय घडतं, तिघेही एकाच दिशेने धावतायत की प्रत्येकाचा डाव वेगळाच आहे, हे प्रश्न ट्रेलर बघितल्यावर आणखी गडद होतात.
कथेतल्या अनेक गोष्टींचे संकेत ट्रेलरमध्ये दिले असले तरी त्यांची उत्तरं मात्र गुपित ठेवण्यात आली आहेत. तात्यांच्या मृत्यूमागचं खरं सत्य काय, एक कोटींची पॉलिसी खरंच भावांच्या हातात येणार का, पैशांसाठी सुरू झालेली ही धावपळ शेवटी कुठे थांबणार आणि या सगळ्या खेळात कोण कोणाला गंडवणार, या प्रश्नांची उत्तरं सिनेमा बघितल्यावरच मिळतील.
शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, मोहन आगाशे, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम अशा कलाकारांच्या भूमिकांची झलक ट्रेलरमध्ये दिसते. कलाकारांचे संवाद, गैरसमज आणि वेगवेगळ्या प्रसंगांमधून तयार होणारा विनोद या गोंधळात आणखी रंगत भरतो. पण या हास्यामागे एकच प्रश्न कायम राहतो, एक कोटी रुपये अखेर कुणाच्या पदरात पडणार.
दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे यांनी सांगितलं की, "टिझरमधून आम्ही 'अफरातफरी'ची सुरुवात दाखवली होती, तर ट्रेलरमधून या गोंधळामागची खरी गंमत आणि पात्रांची धावपळ थोडी अधिक उलगडते. एक कोटी रुपयांची रक्कम या कथेतल्या प्रत्येकाच्या निर्णयाला वेगळी दिशा देते. प्रत्येक पात्राला वाटतं की आपला डाव बरोबर आहे, पण या सगळ्या डावपेचांचा शेवट नेमका कुठे होतो, हे सिनेमा बघितल्यावरच कळेल." पुढे ते म्हणाले, "प्रेक्षकांनी ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडे एक कोडं म्हणून बघावं, कारण पुढच्या क्षणी काय घडेल याचा अंदाज लावणंही तितकंच मजेदार आहे. या गोंधळात प्रेक्षकांना मनापासून हसवण्याचा आमचा प्रयत्न आहे."
मिलिंद झुंबर कवडे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'अफरातफरी'ची निर्मिती अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज यांनी केली आहे. आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहकार्याने हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'अफरातफरी' ९ ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आता एक कोटी रुपयांसाठी सुरू झालेल्या या गोंधळाचा शेवट नेमका कसा होतो, हे बघण्यासाठी प्रेक्षक सिनेमाच्या रिलीजची वाट बघत आहेत.