'जयंती २'ची दुसऱ्या आठवड्यात दमदार घोडदौड, दोन कोटींचा गल्ला जमवला
रॅगिंग आणि भेदभावावर भाष्य करणाऱ्या 'जयंती २' या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून दुसऱ्या आठवड्यात थिएटरमधील शोजची संख्या वाढवण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'जयंती' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता, आणि आता त्याच्या पुढच्या भागाने, 'जयंती २'ने प्रेक्षकांच्या भेटीला येऊन बॉक्स ऑफिसवर चांगलीच हवा तयार केली आहे. कॉलेजमधल्या भेदभावासारखा गंभीर विषय हाताळणाऱ्या या सिनेमाला ११ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज करण्यात आलं होतं. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाच्या शोजमध्ये मोठी वाढ झाल्याचं समोर आलं असून आत्तापर्यंत सिनेमाने २ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
पहिल्या आठवड्यात राज्यभरात जवळपास १५० थिएटरमध्ये या सिनेमाचे शो लागले होते. पण प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि सिनेमाबद्दल होणारी चर्चा बघून दुसऱ्या आठवड्यात निर्मात्यांनी शोजची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली. सध्या २५०हून जास्त थिएटरमध्ये ५००पेक्षा जास्त शो सुरू असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. यासोबतच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
सिनेमाची कथा चंद्रपूरसारख्या भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या पायल या मुलीभोवती फिरते. उच्च शिक्षण घेऊन शेती करण्याचं स्वप्न पायल बघते. पण कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर तिला रॅगिंगचा सामना करावा लागतो. या त्रासाविरोधात पायल आवाज उठवते आणि त्यातून पुढे एक संघर्ष उभा राहतो. या संघर्षात पुढे तिच्यासोबत काय घडतं आणि तिला न्याय मिळतो का, हे सिनेमात दाखवलं आहे.
मात्र कथा फक्त पायलच्या संघर्षापुरती मर्यादित राहत नाही. कॉलेज प्रशासनाचा दृष्टिकोन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून मिळणारी वागणूक, तसेच सरकारची भूमिका असे वेगवेगळे मुद्दे सिनेमात मांडले आहेत. आजच्या काळातही शिक्षणाच्या ठिकाणी भेदभावाचे प्रश्न कसे तयार होतात, याबद्दल 'जयंती २'मधून प्रश्न उपस्थित केले आहेत.
२०२१ मध्ये आलेल्या 'जयंती'नेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. त्याच कथेला पुढे नेत 'जयंती २'मध्ये शिक्षण क्षेत्रातलं भेदभाव आणि त्यामागचं राजकारण असे विषय मांडले आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी निगडित गंभीर विषय आणि विचार करायला लावणारी कथा प्रेक्षकांना आवडल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात शोजची संख्या वाढवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
सिनेमात अभिनेता ऋतुराज वानखेडे मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासोबत पायल जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष यांच्याही भूमिका आहेत. सिनेमाची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली असून कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचं आहे. छायांकन संजीवकुमार हिल्ली यांनी केलं असून संकलनाची जबाबदारी फैसल महाडिक यांनी सांभाळली आहे. गाण्यांना ओंकारस्वरूप यांनी संगीत दिलं असून पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचं आहे.