मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून भाजप नेत्यांना हायकोर्टाने सुनावलं, फडणवीस म्हणतात मुद्दा छोटा

दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून भाजप नेत्यांना हायकोर्टाने सुनावलं, फडणवीस म्हणतात मुद्दा छोटा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

फटाके न फोडण्याचं आवाहन करणारा व्हिडीओ महापालिकेने काढून टाकल्यानंतर मुंबई हायकोर्टाने तो पुन्हा टाकण्याचे निर्देश दिले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

दिवाळी जवळ आली असून देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईत मात्र दिवाळी सणावरून भलताच वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री दिया मिर्झा यांनी दिवाळीत फटाके न फोडण्याचं आवाहन करणारा एक व्हिडीओ केला होता आणि तो सध्या सगळीकडे चर्चेत आहे. भाजप नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण वाढत गेलं. आता मुंबई हायकोर्टाने त्यात महत्त्वाचे निर्देश दिले असून मुंबई महापालिका आणि भाजप नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.

मुंबईतलं वाढतं प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने खास जनजागृती मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत दिया मिर्झा आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह काही प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग होता. याच मोहिमेचा भाग म्हणून दिया मिर्झा यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सोबतच फटाके न फोडण्याचं आवाहनही केलं होतं.

या व्हिडीओवर भाजप नेते अमित साटम यांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळी कशी साजरी करायची, हे शिकवण्यासाठी दिया मिर्झाची गरज नाही, असं म्हणत त्यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर महापालिकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिया मिर्झा यांचा तो व्हिडीओ काढून टाकला. त्यामुळे सोशल मीडियावरही मोठा गदारोळ पाहायला मिळाला.

या प्रकरणाची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, याकडे लक्ष वेधलं. सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडू नयेत, याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी महापालिकेने हा व्हिडीओ तयार केला होता. त्यामुळे काढून टाकलेला व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर टाकावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

या सगळ्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे. न्यायालयाने भाजप नेत्यांना फटकारलं, असं आपल्याला वाटत नाही, असं ते म्हणाले. मुळात हे प्रकरण न्यायालयात गेलंच नाही, आणि व्हिडीओ हटवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेचा होता, असं त्यांनी सांगितलं.

फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केलं की, दिया मिर्झा या देशातील मोठ्या नेत्या नाहीत आणि हा मुद्दा इतका छोटा आहे की तो आमच्या पातळीवरचा प्रश्न नाही. म्हणजेच दिया मिर्झा कुणी मोठ्या नेत्या नसून हा प्रश्न छोटा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

एकीकडे प्रदूषणाचा प्रश्न आहे आणि दुसरीकडे धार्मिक भावनांचा, अशा दोन्ही बाजूंनी हा विषय चर्चेत आला आहे. त्यामुळे दिया मिर्झा यांचा हा व्हिडीओ पुन्हा पोस्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर कशा प्रतिक्रिया उमटतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ