पश्चिम रेल्वेची 'ऑपरेशन दीप' मोहीम, १४ नोव्हेंबरपर्यंत विनातिकीट प्रवाशांवर कारवाई
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये वाढलेल्या गर्दीत पश्चिम रेल्वेने मुंबई विभागात तिकीट तपासणी वाढवली आहे. नियम मोडणाऱ्यांकडून दंड घेतला जाणार आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या गर्दीत विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. 'ऑपरेशन दीप' असे या मोहिमेचे नाव असून ती १४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
या मोहिमेअंतर्गत मुंबई विभागातील स्टेशन आणि गाड्यांमध्ये तिकीट तपासणीचा आवाका वाढवण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणारे, आरक्षित डब्यांत अनधिकृतपणे घुसणारे आणि चुकीच्या श्रेणीतून प्रवास करणारे प्रवासी या मोहिमेच्या कक्षेत येतील. नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाणार आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी वाढली की तिकीट तपासणीचे आव्हानही वाढते. विनातिकीट प्रवाशांमुळे वैध तिकीट असलेल्या प्रवाशांची गैरसोय होते. म्हणूनच तपासणीचे नियोजन अधिक व्यापक करण्यात आले आहे. स्टेशनवरची नेहमीची तपासणी तर होईलच, शिवाय अचानक तपासणी, सापळा कारवाई आणि विशेष पथकांच्या मदतीने गाड्यांमध्येही तपासणी केली जाणार आहे.
'ऑपरेशन दीप' या नावातील प्रत्येक अक्षर एका टप्प्याकडे निर्देश करते. शोध, तपासणी, नियमांची अंमलबजावणी आणि दंडवसुली अशा चार टप्प्यांवर मोहिमेत भर आहे. 'डी' म्हणजे डिटेक्टिव्ह, यात विनातिकीट प्रवाशांचा शोध घेतला जाईल. 'ई' म्हणजे एक्झामिन, यात तिकिटे आणि आवश्यक कागदपत्रे तपासली जातील. दुसरे 'ई' म्हणजे इन्फोर्स, यात रेल्वेच्या नियमांची अंमलबजावणी होईल. 'पी' म्हणजे पेनलाइज, या टप्प्यात नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाईल.
तिकीट तपासणीच्या वेळी होणारे वाद, कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि प्रवाशांशी होणारा संवाद अधिक पारदर्शक राहावा, यासाठी पश्चिम रेल्वेने बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचा प्रयोग सुरू केला आहे. मुंबई सेंट्रल विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना हे कॅमेरे आणि विशेष काळ्या रंगाची जॅकेट देण्यात आली आहेत. सुरुवातीला १५ बॉडी कॅमेरे आणि ३० जॅकेट देण्यात आली आहेत. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात असून, त्यातून तपासणी प्रक्रियेवर अधिक नियंत्रण ठेवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी पश्चिम रेल्वे फक्त नेहमीच्या तपासणीवर अवलंबून नाही. स्टेशन तपासणी, सापळा तपासणी, अचानक धाड, फोर्ट्रेस चेक आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमा अशा अनेक पद्धती वापरल्या जात आहेत. मेल, एक्स्प्रेस आणि विशेष रेल्वेगाड्यांमध्येही ही कारवाई केली जाते.
रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार विनातिकीट प्रवासासाठी किमान ५०० रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाआधी वैध तिकीट काढावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.