दिवाळीत लॉटरी घेताय? 27 तिकिटांच्या गणिती पद्धतीत धोकाही तितकाच आहे
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मँचेस्टर विद्यापीठातील दोन गणितज्ज्ञांनी ब्रिटनच्या नॅशनल लॉटरीसाठी एक पद्धत मांडली आहे. तिच्यात बक्षीस मिळण्याची हमी आहे, पण खर्च वसूल होईलच असे नाही.
दिवाळी म्हटली की घरोघरी फराळ आणि रोषणाई तर असतेच, पण अनेक जण या सणात नशीब आजमावण्यासाठी लॉटरीचं तिकीट घेतात. कष्ट न करता सहज पैसे मिळावेत आणि आपलीच लॉटरी लागावी, असं प्रत्येकाला वाटत असतं. लॉटरी जिंकणं हा पूर्णपणे नशिबाचा खेळ मानला जातो. पण एखादी गणिती युक्ती वापरून प्रत्येक ड्रॉमध्ये काही ना काही बक्षीस मिळू शकतं, असं कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?
मँचेस्टर विद्यापीठातील दोन ब्रिटिश गणितज्ज्ञ डेव्हिड स्टीवर्ट (David Stewart) आणि डेव्हिड कुशिंग (David Cushing) यांनी आपल्या संशोधनातून असा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटनच्या (UK) नॅशनल लॉटरीमध्ये अगदी अचूकपणे निवडलेली फक्त 27 तिकिटं घेतली, तर प्रत्येक ड्रॉमध्ये कमीत कमी एक बक्षीस नक्की मिळू शकतं. या दोघांनी ही खास पद्धत शोधून काढली आहे. तिच्यामुळे लहानसहान बक्षीस किंवा मोफत तिकिटं हमखास मिळू शकतात.
आता ही पद्धत नेमकी कशी चालते ते पाहू. 1 ते 59 या नंबरांमध्ये भौमितिक आकार तयार करून त्यात या गणितज्ज्ञांनी 27 खास नंबरसेट नीट मांडले आहेत. ही रचना अशी केलेली आहे की त्यातल्या कोणत्याही एका तिकिटाचे किमान दोन नंबर ड्रॉमधल्या नंबरांशी जुळतील. याच पॅटर्नप्रमाणे 27 तिकिटं घेऊन प्रयोगही करण्यात आला. त्या प्रयोगात तीन तिकिटांवर प्रत्येकी दोन नंबर जुळले आणि त्यामुळे 3 लकी डिप्स, म्हणजे मोफत तिकिटं, मिळाली.
आता या पद्धतीची दुसरी बाजू. या युक्तीमुळे लॉटरीच्या ड्रॉमध्ये छोटी किंवा मोठी बक्षिसं अथवा मोफत तिकिटं मिळण्याची खात्री मिळते. पण त्यातून मोठा जॅकपॉट लागेलच, असं सांगता येत नाही. शिवाय यात एक मोठा धोका आहे. 27 तिकिटं घेण्यासाठी जो खर्च येतो आणि त्याबदल्यात जे रोख बक्षीस मिळतं, त्यांच्यात तफावत असू शकते.
शेलहैमचे तज्ज्ञ पीटर रॉलेट यांच्या मते, तांत्रिकदृष्ट्या ही युक्ती अगदी बरोबर आहे. तरीसुद्धा 99 टक्के लोकांच्या बाबतीत या पद्धतीमुळे फायद्यापेक्षा तोटा होण्याची शक्यता जास्त असते. स्टीवर्ट आणि कुशिंग यांनीही मान्य केलं आहे की त्यांनी जितके पैसे गुंतवले, त्यापेक्षा जास्त त्यांचं नुकसान झालं.
म्हणजेच, मँचेस्टरच्या या गणितज्ज्ञांचं संशोधन असं दाखवतं की गणिताच्या ताकदीवर रणनीती आखून विजय मिळवणं शक्य आहे. पण जुगार किंवा लॉटरीच्या खेळातला आर्थिक धोका आणि नुकसानीची शक्यता कधीच पूर्णपणे संपत नाही. हे फक्त गणिताच्या वापरातून समजून घ्यायचं एक उदाहरण आहे. याकडे आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला म्हणून पाहू नये.
त्यामुळे या दिवाळीत लॉटरीचं तिकीट घेऊन नशीब आजमावायचा विचार असेल, तर गणिताचा हा खेळ फक्त मनोरंजनापुरताच ठेवावा. कारण नशीब आणि जोखीम यात अनिश्चितता कायमच असते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.