दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांची सीबीआयकडे आदित्य ठाकरेंसह इतरांच्या अटकेची मागणी
दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन आज मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरेंना अब्रुनुकसानीची नोटीस देण्याची शक्यता आहे.
दिशा सालियन प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन हे आज दुपारी ४ वाजता ठाकरे कुटुंबाच्या मातोश्री या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका पोस्टवरुन सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. याच संदर्भात नोटीस देण्यासाठी सतीश सालियन आज मातोश्रीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी स्वतःला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही सालियन यांनी केली आहे.
सतीश सालियन यांनी सीबीआयला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि इतरांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात भारतीय दंड विधानाचे कलम ४०९ जोडण्यासोबतच कथित बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणे आणि प्रकरण दडपण्याबाबत प्रत्यक्षदर्शी तसेच इतर महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पुरेसे पुरावे हातात असल्याशिवाय या विषयावर अजिबात बोलू नये, असे स्पष्ट आदेश चव्हाण यांनी दिले आहेत. पुराव्यांशिवाय कोणत्याही विषयावर सार्वजनिकरित्या बोलणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी नेत्यांना संयम बाळगण्याचे बजावले आहे.
१६ सप्टेंबरला आदित्य ठाकरे यांनी आपल्याला दिशा सालियन यांची ओळख नसल्याचे सांगणारी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली होती. याच पोस्टवरुन आदित्य ठाकरे यांना मानहानीची नोटीस जारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप हे आपल्यालाच उद्देशून असल्याचा दावा सतीश सालियन यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आपल्याकडे सगळे पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आपण कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी लढत असताना, राजकीय हेतूने आणि वैयक्तिक वैमनस्यातून आपल्यावर आरोप केले जात असल्याचा आक्षेपही सतीश सालियन यांनी नोंदवला आहे.
कायदेशीर नोटीस बजावताना अडथळा निर्माण होण्याची किंवा सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही सतीश सालियन यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्वतःला आणि आपल्या कायदेशीर टीमला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष आणि कायदेशीर चौकशी व्हावी यासाठी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे सतीश सालियन यांनी स्पष्ट केले आहे.