रस्त्याच्या कामाबाबत प्रश्न विचारल्यावर मंत्री प्रवेश वर्मांनी तरुणाला मारल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल
दिल्लीतील तिलक नगर भागात रस्त्याच्या कामाची पाहणी करताना PWD मंत्री प्रवेश वर्मा यांनी एका तरुणाच्या कानाखाली मारल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून AAP ने कारवाई आणि माफीची मागणी केली आहे.
दिल्लीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या कामाबाबत प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला मंत्र्याने थेट मारल्याचा आरोप होत असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी 27 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या तिलक नगर भागात PWD मंत्री प्रवेश वर्मा रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते.
याचवेळी एक तरुण तिथे पोहोचला आणि त्याने रस्त्यावरील खराब भाग मंत्र्यांना दाखवला. रस्त्यावर खड्डे पडले आहेत आणि काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असा सवाल त्या तरुणाने उपस्थित केला. हा प्रश्न विचारताच मंत्री एवढे संतापले की त्यांनी थेट तरुणाच्या कानाखाली मारली, असा आरोप केला जात आहे. ही संपूर्ण घटना कोणीतरी मोबाईलमध्ये कैद केली असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मंत्री प्रवेश वर्मा अधिकाऱ्यांसोबत रस्त्यावर उभे असल्याचे दिसते. यावेळी एक तरुण पुढे येऊन रस्त्याकडे बोट दाखवत काहीतरी सांगताना दिसतो. इथले काम नीट झालेले नाही, रस्ता कसा उखडला आहे ते बघा, असे तो सांगतो. हे ऐकताच मंत्र्याचा पारा चढल्याचे आणि त्यांनी तरुणावर हात उगारल्याचे व्हिडिओत दिसते. आजूबाजूला उभे असलेले लोक मध्ये पडतात, तर घाबरलेला तरुण मागे सरकतो. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर काहीच तासांत लाखो लोकांनी पाहिला.
आम आदमी पक्षाने ही घटना सोशल मीडियावर शेअर करत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. रस्त्याच्या कामातील कथित भ्रष्टाचाराबाबत काही लोक मंत्र्यांना प्रश्न विचारत होते, असा दावा AAP ने केला आहे. भाजपचे मंत्री जनतेचा आवाज दाबत असल्याचा आणि सामान्य माणसाने प्रश्न विचारला तर त्याला मारहाण केली जात असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. हे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचेही AAP ने म्हटले आहे.
मंत्री प्रवेश वर्मा यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी AAP ने केली आहे. दिल्लीच्या जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि रस्त्याचे काम खराब असेल तर जनता विचारणारच, असे पक्षाचे म्हणणे आहे. दुसरीकडे भाजपकडून याबाबत अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर आलेले नाही. व्हिडिओ नीट बघावा, यातून गैरसमज झाला आहे, असे मंत्री कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.
सोशल मीडियावर मात्र लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आम्ही टॅक्स भरतो, रस्ता खराब असेल तर प्रश्न विचारणारच, प्रश्न विचारला म्हणून मारणार का, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. निवडणुकीआधी हात जोडता आणि निवडणूक झाली की हात उगारता, अशीही टीका काही जणांनी केली आहे. या एका घटनेने दिल्लीच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला असून सरकार यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.