'प्रलय' क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनारपट्टीवर यशस्वी चाचणी; पुण्यातील तीन संस्थांचा मोठा वाटा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
डीआरडीओने बुधवारी ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून स्वदेशी बनावटीच्या 'प्रलय' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) बुधवारी, ५ तारखेला, ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून 'प्रलय' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र स्वदेशी बनावटीचे असून अर्ध-बॅलिस्टिक प्रकारातले आहे. वापरकर्ता मूल्यमापन चाचण्यांचा (यूजर इव्हॅल्युएशन ट्रायल्स) भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राच्या रचनेत आणि विकासात पुण्यातील डीआरडीओच्या तीन संशोधन संस्थांचा मोठा वाटा आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चाचणीत ठरवलेली सगळी उद्दिष्टे यशस्वीपणे पूर्ण झाली. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्राने (आयटीआर) वेगवेगळी उपकरणे तैनात केली होती. या उपकरणांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे या यशाला दुजोरा मिळाला.
'प्रलय' हे घन इंधनावर चालणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. त्यात आधुनिक मार्गदर्शन आणि दिशादर्शन प्रणाली वापरली आहे, त्यामुळे लक्ष्यावर अचूक मारा करणे शक्य होते. वेगवेगळ्या प्रकारच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी हे क्षेपणास्त्र निरनिराळ्या प्रकारची पारंपरिक स्फोटके वाहून नेऊ शकते. भारतीय लष्कर आणि हवाई दलात त्याचा समावेश करण्याचे नियोजन आहे.
या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी डिसेंबर २०२१ मध्ये झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या संरचनांमध्ये त्याच्या चाचण्या घेतल्या गेल्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सलग दोन क्षेपणास्त्रे डागण्याची (सॅल्व्हो लॉन्च) चाचणीही यशस्वी झाली होती. सध्याच्या वापरकर्ता मूल्यमापन चाचण्या पूर्ण झाल्यावर हे क्षेपणास्त्र लष्करात दाखल होण्यासाठी सज्ज होईल.
या क्षेपणास्त्राच्या विकासात हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारत ही प्रमुख संस्था आहे. तिच्यासह पुण्यातील तीन संस्थांनी योगदान दिले आहे. या संस्था म्हणजे आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई), हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (इंजिनिअर्स). याशिवाय डीआरडीओच्या इतर संशोधन संस्थाही या प्रकल्पात सहभागी आहेत.
विकास आणि उत्पादन भागीदार असलेल्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीने या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, संरक्षण दल आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांचे अभिनंदन केले. प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे लष्कराची तांत्रिक क्षमता आणि बदलत्या धोक्यांचा सामना करण्याची तयारी आणखी बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संरक्षण सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष राजेश कुमार सिंह यांनीही चाचणीत सहभागी झालेल्या सर्व पथकांचे अभिनंदन केले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.