धुळे गुन्हा: रायगडच्या गर्भवती महिलेला बीडमध्ये मारहाण, धुळ्यात जिवंत जाळले; 11 तासांच्या सीसीटीव्हीतून
कला केंद्रात काम करताना झालेल्या भांडणातून एका गर्भवती महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना धुळे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मोहाडी पोलिसांनी तीन दिवसांत तपास करून चार जणांना अटक केली आहे.
कला केंद्रात एकत्र काम करताना झालेल्या अंतर्गत भांडणातून एका गर्भवती महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना धुळे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पिंकी हनुमंत काटकर (वय 31, राहणार रायगड) असे मृत महिलेचे नाव असून धुळे तालुक्यातील गरताडबारी परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणात मोहाडी पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत तपास पूर्ण करत चार जणांना अटक केली असून त्यापैकी दोन आरोपी अद्याप फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी काटकर आणि आरोपी एकाच कला केंद्रात एकत्र काम करत होते. याच काळात त्यांच्यात अंतर्गत वाद निर्माण झाला होता. या वादाच्या रागातून आरोपींनी बीडमध्ये पिंकी हिला बेदम मारहाण केली, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. या मारहाणीचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी बेशुद्ध अवस्थेतील पिंकी हिला वाहनात टाकून राजस्थानच्या दिशेने पळ काढला. या प्रवासादरम्यान गाडी धुळ्याजवळील गरताडबारी शिवारात पोहोचली, तेव्हा आरोपींनी बेशुद्ध अवस्थेतील गर्भवती पिंकी हिच्यावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घटना घडल्यानंतर मोहाडी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला. महामार्गावरील विविध सीसीटीव्ही फुटेजची तब्बल 11 तास बारकाईने तपासणी केल्यानंतर पोलिसांना एक संशयित ह्युंदाई मोबिलो गाडी (क्रमांक MH 43 / AR 4070) निदर्शनास आली. याच गाडीच्या धाग्यावरून आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाराशिव आणि अहिल्यानगर येथे कारवाई करत कला केंद्रात काम करणाऱ्या दोन महिलांसह चौघांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सर्फराज ऊर्फ शफिक अलीम मोमीन (38, राहणार धाराशिव), आरिफ ऊर्फ खुज्या आसिफ शेख (31, राहणार धाराशिव), स्वाती ऊर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (28, राहणार अहिल्यानगर) आणि लक्ष्मी बालाजी पवार (30, राहणार धाराशिव) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील फारुख शेख (राहणार धाराशिव) आणि रोहिणी जाधव (राहणार छत्रपती संभाजीनगर) हे दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने अवघ्या तीन दिवसांत हा गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.