डेटिंग अॅपवरील ओळखीतून सहाय्यक लोको पायलटला ११ लाख ७० हजारांचा गंडा, चंद्रपुरात गुन्हा दाखल
ऑनलाईन टास्कच्या नावाखाली २७ टप्प्यांत ११ लाख ७० हजार ९५७ रुपये गुंतवायला लावल्याची तक्रार चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात आली आहे.
चंद्रपुरात ऑनलाईन फसवणुकीचा एक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरील डेटिंग अॅपवर झालेल्या ओळखीनंतर ऑनलाईन टास्कच्या नावाखाली एका तरुणाला तब्बल ११ लाख ७० हजार ९५७ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदाराने चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
तक्रारदार सुमन कुमार राम बिलास प्रसाद हे ३३ वर्षांचे आहेत. ते मूळचे बिहारचे रहिवासी असून सध्या बल्लारपूर येथील संत तुकाराम हॉलजवळ राहतात. ते सहाय्यक लोको पायलट म्हणून काम करतात.
तक्रारीनुसार, १६ जून २०२६ रोजी 'ट्रुली मॅडली' (Truly Madly) या डेटिंग अॅपवर त्यांची 'रिया कपूर' नावाच्या मुलीशी ओळख झाली. पुढे दोघांची मैत्री वाढली आणि व्हॉट्सअॅप व टेलिग्रामवरून त्यांचे नियमित बोलणे सुरू झाले.
काही दिवसांनी, २६ जून रोजी रियाने त्यांना 'www.esellerstorebuy.xyz' या साईटवर अकाउंट (ID) तयार करून प्रॉडक्ट खरेदी-विक्रीचे काम करण्याचा सल्ला दिला. सेलरकडून ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पैसे गुंतवावे लागतील, आणि ऑर्डर कस्टमरला डिलिव्हर झाल्यावर नफ्यासह सगळी रक्कम वॉलेटमध्ये परत येईल, असे आमिष दाखवण्यात आले.
तिच्या सांगण्यावरून सुमन कुमार यांनी यूजर आयडी तयार केला. त्यानंतर २६ जून ते २४ जुलै २०२६ या काळात त्यांनी वेगवेगळ्या यूपीआय (UPI) आणि बँक खात्यांमधून २७ टप्प्यांत एकूण ११ लाख ७० हजार ९५७ रुपये गुंतवले.
काही दिवसांनी त्यांनी कमावलेला नफा आणि गुंतवलेली मुद्दल काढण्याचा (Withdrawal) प्रयत्न केला. तेव्हा रियाने खाते कायमचे बंद करण्यासाठी अतिरिक्त १,७९९ डॉलरची मागणी केली. पैसे देणे जमणार नाही असे सांगून त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली. त्यावर तिने नफ्याची रक्कम भारतीय रुपयांत बदलण्यासाठी १,६५५.८३ डॉलर, किंवा बायनन्स खात्यातून पैसे काढण्यासाठी ४९९ डॉलर भरायला सांगितले.
सतत पैशांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे सुमन कुमार यांच्या लक्षात आले. त्यांनी आणखी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा संशयित आरोपी रियाने व्हॉट्सअॅप व टेलिग्रामवरून त्यांच्याशी संपर्क तोडला.
फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर सुमन कुमार यांनी चंद्रपूर सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६ (क), ६६ (ड) सह भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(२), ३०८ आणि ३(५) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक सुनील विठ्ठलराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.