दीड वर्षांपासून फरार असलेले दोघे सख्खे भाऊ पुणे गुन्हे शाखेच्या ताब्यात, नोकरी करून पोलिसांना दिला होता चकवा
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने ही कारवाई केली. सागर शैलेश गायकवाड (वय २५) आणि आकाश शैलेश गायकवाड (वय २६, दोघे रा. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या नजरेतून लपण्यासाठी हे दोघे नोकरी करत होते, असे तपासात उघडकीस आले आहे. त्यापैकी एक जण सुसगाव येथील एका ओल्डएज होममध्ये, तर दुसरा कात्रज-कोंढवा परिसरातील एका जिममध्ये कामाला होता. अशा प्रकारे नोकरी करत राहून दोघांनी इतके दिवस पोलिसांना चकवा दिला होता.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर आणि पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पिंगळे, अमित गद्रे, परमेश्वर नरवडे, साईकुमार कारके, साधना पवार व अजित शिंदे यांच्या पथकाने आरोपींना पकडले.
सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३३३, ११५(२), ३५२ आणि ३५१(२)(३) लावण्यात आली आहेत. हे दोन्ही आरोपी गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होते. रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या आणि फरार आरोपींचा शोध घ्यावा, असे आदेश वरिष्ठांनी पथकाला दिले होते. त्यानुसार पथकाचा शोध सुरू होता.
या शोधादरम्यान दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पिंगळे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी सागर गायकवाड हा सुसगावमधील पायगुडेनगर येथे असलेल्या 'श्री. माऊली ओल्डएज होम'मध्ये नोकरी करत आहे. दुसरीकडे, दुसरा आरोपी आकाश गायकवाड हा टिळेकर नगरमधील 'वर्ल्ड फिटनेस जिम'मध्ये कामाला असल्याची कुणकुण पोलीस अंमलदार अमित गद्रे यांना लागली.
ही माहिती हाती आल्यानंतर पथकाने सुसगाव आणि कात्रज-कोंढवा परिसरात एकाच वेळी सापळा रचला. पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून दोन्ही आरोपींना फिल्मी स्टाइलने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोघांना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.