शिवाजी पार्कवर कॉकरोच जनता पार्टीचे 'जेल भरो', अभिजीत दिपके यांची मोदी आणि संघावर टीका
गांधी जयंतीच्या दिवशी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केले. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज, २ ऑक्टोबर २०२६ रोजी, महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी पार्कमध्ये आंदोलन झाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन होते. त्याला 'जेल भरो आंदोलन' असे नाव देण्यात आले होते.
आंदोलनस्थळी १५ ते २० जणांचा एक गट आला आणि त्यांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली आणि घोषणाबाजी करणाऱ्या या गटाला आंदोलनस्थळापासून दूर नेले.
आपल्या भाषणात अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "आज तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात. महात्मा गांधींना यापेक्षा मोठी श्रद्धांजली असू शकत नाही. इथे उपस्थित असलेला प्रत्येकजण गांधी आहे. आरएसएसच्या लोकांनी महात्मा गांधींना जितका त्रास दिला नाही, त्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला दिला आहे. पण गांधी मरत नाही. गांधी हे या देशाचा आत्मा आहेत. गोडसेसारखे हजारो येतील आणि हजारो जातील. पण या देशात महात्मा गांधींच्या विचाराने, त्यांच्या मार्गाने चालणारे आहेत. त्यांच्या विचारानेच हा देश टिकला आहे."
दिपके पुढे म्हणाले, "गोडसे विचारांच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही महात्मा गांधीजींना कधीही संपवू शकत नाही. एक महामानव येतो आणि म्हणतो मी नॉन बायोलॉजिकल आहे, आम्हालाही कळतंय की तुम्ही मनुष्य असूच शकत नाही. ते स्वतःला गांधी आणि नेहरूंपेक्षा मोठं करू पाहत आहेत. पण ते या जन्मात काय, पुढच्या सात जन्मातही शक्य नाही. गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांची बरोबरी करण्याची तुमची पात्रता नाही. गांधीजी या देशाचा आत्मा आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचा कणा आहेत आणि जवाहरलाल नेहरू हे या देशाचे मन आहेत."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही दिपके यांनी टीका केली. ते म्हणाले की, मोदींना फक्त जनतेला लुटता येतं आणि त्यांच्याकडे देशाला देण्यासाठी काही नाही. नोटबंदी करून त्यांनी जनतेला रांगेत उभे केले, कोरोनात लस घेण्यासाठी रांगा लावायला लावल्या आणि आता मतदारयादीत नाव येण्यासाठीही रांगेत उभे राहायला सांगत आहेत, असे दिपके यांनी म्हटले आहे.
आंदोलनामुळे शिवाजी पार्क परिसरात वाहतूककोंडी झाली आणि रहदारीत अडथळा आला. मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले आणि नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले. शिवाजी पार्क हे संवेदनशील आणि 'शांतता क्षेत्र' म्हणून ओळखले जाते. इथे वारंवार होणाऱ्या राजकीय आंदोलनांमुळे शांतता भंग होते, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
तणावपूर्ण वातावरणामुळे स्थानिक दुकानदारांच्या रोजच्या व्यवहारावर परिणाम होत आहे. गर्दी आणि गोंगाटामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आपत्कालीन वाहनांना, विशेषतः रुग्णवाहिकेला, ये-जा करताना अडचण येत आहे.
मुंबई पोलिसांनी २०१३ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली होती. तरीही कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र जमले, त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.