मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:31 IST

मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला, चालकाला कड्याने मारहाण; दोन अज्ञातांवर गुन्हा

पैठणहून छत्रपती संभाजीनगरला परतणाऱ्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या शासकीय गाडीवर विट्स हॉटेल चौकात हल्ला झाला. वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला, चालकाला कड्याने मारहाण; दोन अज्ञातांवर गुन्हा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

पैठण येथील न्यायालयीन काम संपवून छत्रपती संभाजीनगरला परतणाऱ्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या शासकीय गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या चालकाला कड्याने मारहाण करण्यात आली, तर गाडीच्या दरवाज्यावर हातोड्याने घाव घालून नुकसान करण्यात आले. ही घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास विट्स हॉटेल चौकात घडली. मारहाण करून गाडीचे नुकसान करणाऱ्या दोघा अज्ञातांविरोधात वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शेख एकबाल शेख इब्राहिम (वय ४६, रा. गल्ली क्रमांक २२, बायजीपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी जिल्हा न्यायालयात शिपाई म्हणून काम करतात आणि सध्या मुख्य न्याय दंडाधिकारी आर.एस. जांबोटकर यांच्या शासकीय गाडीवर चालक म्हणून काम पाहतात. त्यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी सकाळी नेहमीच्या ड्युटीवर आल्यावर त्यांनी जांबोटकर यांना त्यांच्या निवासस्थानावरून न्यायालयात आणले.

त्यानंतर न्यायालयीन कामकाज आणि निरीक्षणासाठी ते जांबोटकर, वरिष्ठ लिपिक वैद्य आणि शिपाई साहेबराव पाटील यांना घेऊन शासकीय गाडीने पैठण न्यायालयात गेले होते. तिथले काम आटोपल्यावर चौघेही त्याच गाडीने छत्रपती संभाजीनगरकडे निघाले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील विट्स हॉटेल चौकात गाडी आली असता अचानक एक दुचाकी गाडीसमोर आली, म्हणून चालकाने गाडी थांबवली. तेव्हा गाडीतील शिपाई साहेबराव पाटील यांनी हाताने इशारा करून दुचाकी बाजूला घ्यायला सांगितले.

फिर्यादीनुसार, याचा राग आल्याने दुचाकीस्वार खाली उतरला. तो शिवीगाळ करत शासकीय गाडीच्या काचेवर हाताने मारू लागला आणि काच उघडायला सांगू लागला. चालकाने काच उघडली नाही, म्हणून त्याने गोंधळ घातला. त्याच वेळी त्याच्यासोबत दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या व्यक्तीने दुचाकीच्या हॅण्डलवर ठेवलेली हातोडी काढली आणि चालकाच्या बाजूच्या दरवाज्यावर मारायला सुरुवात केली.

याच दरम्यान चालकाने काच खाली केली, तेव्हा दुचाकीस्वाराने हातातले कडे काढून चालकाच्या तोंडावर जोरात वार केला आणि त्यांना जखमी केले. या प्रकारामुळे चौकात नागरिकांची गर्दी जमली.

गाडीवर मुख्य न्याय दंडाधिकारी, औरंगाबाद असे लिहिलेले असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तींनी आपल्या दुचाकी बन्सीलालनगरच्या दिशेने नेत तिथून पळ काढला. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्ला करणारे दोघेही अज्ञात असून त्यांच्याविरोधात वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ