मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:59 IST

चंद्रपुरात जाहिरात बोर्डाच्या वादातून महिलेचा विनयभंग, माजी नगरसेवकावर गुन्हा

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प भागात दुकानासमोर जाहिरातीचा बोर्ड लावण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प भागात शितला माता मंदिराजवळ एका किरकोळ वादाने मोठे वळण घेतले. दुकानासमोर जाहिरातीचा बोर्ड लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या भांडणात एका महिलेचा विनयभंग झाल्याचा आणि तिला व तिच्या मुलाला मारहाण झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक अजय सरकार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर आणि इतर काहीजणांवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी साधारण पाच वाजता ही घटना घडली. तक्रारदार महिलेच्या दुकानात बिस्किटांची विक्री चांगली होत असल्याने संबंधित कंपनीने दुकानासमोर जाहिरातीचा बोर्ड लावण्यासाठी गाडी आणि कामगार पाठवले होते. मात्र दुकानासमोर पुरेशी जागा नसल्याने कामगारांनी शेजारीच राहणारे भाजपचे कार्यकर्ते व माजी नगरसेवक अजय सरकार यांच्या घरासमोर गाडी उभी करून बोर्ड लावण्याचे साहित्य उतरवण्यास सुरुवात केली. यावरून अजय सरकार, त्यांचा मुलगा, पत्नी आणि मुलगी यांनी तीव्र आक्षेप घेत कंपनीच्या कामगारांना शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे.

आरडाओरडा ऐकून तक्रारदार महिला आणि तिचा मुलगा मदतीसाठी बाहेर आले आणि त्यांनी कामगारांना स्वतःच्या घरात बोलावून घेतले. मात्र अजय सरकार व त्यांचा मुलगा जबरदस्तीने घरात घुसले, असा आरोप तक्रारीत आहे. महिलेने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता अजय सरकार यांनी तिचे हात पकडून, गळा दाबून आणि पोटावर लाथ मारून असभ्य वर्तन केले व तिचा विनयभंग केला, असा आरोप आहे. त्यांच्या मुलाने फावडे घेऊन घरात घुसून धक्काबुक्की व मारहाण केली, तर मुलीने दुकानातील सामानाची तोडफोड केली, असेही तक्रारीत नमूद आहे.

या गोंधळादरम्यान बाहेर उभी असलेली महिलेची होंडा फॅशन ही गाडी (क्रमांक MH 34 CT 7616) अजय सरकार यांनी खाली पाडून तिची नंबर प्लेट तोडल्याचा आणि नुकसान केल्याचा आरोप आहे. सोबत असलेल्या काही जणांनी महिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकारानंतर पीडित महिलेने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अजय सरकार, त्यांचे कुटुंबीय, श्रीनिवास आणि अनोळखी तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ७४ (विनयभंग), ३३३, ३५१(२), ३५२, ११५(२), २९६, ३२४(४), १८९(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(१), १९१(२) आणि १९१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी प्रथम खबर क्रमांक ११३३/२०२६ नोंदवण्यात आला असून रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ