सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
14:04 IST

चंद्रपुरात वडेट्टीवार-मुनगंटीवार भेट: "आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री व्हावा" या बोलण्याची चर्चा

चंद्रपुरातील कार्यक्रमाबाहेर झालेल्या भेटीत विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

चंद्रपुरात वडेट्टीवार-मुनगंटीवार भेट: "आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री व्हावा" या बोलण्याची चर्चा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यातला एक छोटासा संवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरतोय. मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडीओत वडेट्टीवार हस्तांदोलन करताना दिसतात. "आपण दोघेही वार आहोत... आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे," असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ही भेट चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी भागात झाली. तिथे काल तेलगू भाषिकांचा बदकम्मा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला हजेरी लावून बाहेर पडत होते. तेवढ्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आत येत होते. दोघांची काही क्षणांपुरती भेट झाली.

या भेटीत वडेट्टीवार यांनी हसतमुखाने हस्तांदोलन केलं आणि मुनगंटीवार यांच्यासोबत आपली "मन की बात" शेअर केली, असं व्हिडीओवरून समोर आलं आहे. वडेट्टीवार यांच्या या शुभेच्छांना मुनगंटीवार यांनीही दिलखुलास हसत दाद दिली. आता या व्हिडीओवरून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या मनात काही वेगळी खलबतं सुरू आहेत का, अशी चर्चा रंगली आहे.

राज्याचं सर्वोच्च पद आपल्याला मिळावं, ही प्रत्येकाची इच्छा असते, मग तो सत्तेतला असो किंवा विरोधी पक्षातला. मधल्या काळात आपल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्याची चढाओढही पाहायला मिळाली होती. काही नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाची आपली मनातली इच्छा बोलूनही दाखवली होती.

मुनगंटीवार यांच्याबद्दलची चर्चा आधीपासून सुरू आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं, तेव्हा मुनगंटीवार यांना महत्त्वाची जबाबदारी मिळेल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे ते नाराज झाले होते आणि त्यांनी वेळोवेळी ती नाराजी बोलूनही दाखवली होती. अनेकदा त्यांनी थेट सरकारला आरसा दाखवण्याचं कामही केलं होतं. तरीही आपण कुठेही जाणार नाही, असं मुनगंटीवार यांनी अनेकदा स्पष्ट केलं होतं. मात्र, काल प्रचंड गर्दीत आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात वडेट्टीवार यांनी हे थेट विधान केल्याने चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

दरम्यान, टायगर श्रॉफ याच्यावर काल झालेल्या हल्ल्यावरून विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा हल्ला म्हणजे सरकारचं अपयश आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली.

मुंबईसारख्या संवेदनशील शहरात लॉरेन्स बिश्नोई गँगचं साम्राज्य अशा पद्धतीने उभं राहणं हे सरकारचं अपयश आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. "या साम्राज्यामागे सरकारच आहे काय?" असा सवालही त्यांनी केला होता.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ