सराईत गुन्हेगार अमोल ईलमकरवर एमपीडीए अंतर्गत कारवाई; वर्षभरासाठी स्थानबद्ध
गणेशोत्सवाच्या तोंडावर चंद्रपूर पोलिसांनी १९ गुन्हे दाखल असलेल्या दुर्गापूरच्या गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध केले.
गणेशोत्सव तोंडावर असताना चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर मोहीम हाती घेतली आहे. सण-उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी ही प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत दुर्गापूर येथील कुख्यात गुन्हेगार अमोल आदेश ईलमकर याला लक्ष्य करण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारी जगतावर आपली पकड आणखी मजबूत करत, सराईत आणि धोकादायक गुन्हेगारांवर अशी धडक कारवाई सुरू केली आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या सूचनेनुसार ही कारवाई पार पडली. अमोल ईलमकर (वय २६, रा. समतानगर, वॉर्ड क्र. ६, दुर्गापूर, ता. जि. चंद्रपूर) हा चंद्रपूर जिल्हा पोलीस दप्तरी नोंद असलेला कुख्यात चोर आणि धोकादायक गुन्हेगार आहे. त्याच्यावर दुर्गापूर, रामनगर, बल्लारशाह, घुग्घूस आणि मूल या पोलीस स्टेशनांमध्ये चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, अश्लील शिवीगाळ आणि आर्म्स ॲक्टअंतर्गत असे मिळून तब्बल १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सातत्यपूर्ण गुन्हेगारीमुळे तो परिसरातील सामान्य नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण करत होता. यापूर्वीही त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया झाल्या होत्या, पण कायद्याला न जुमानता त्याने आपले गुन्हेगारी उद्योग थांबवले नव्हते. अखेर त्याच्या वाढत्या उपद्रवाची गंभीर दखल पोलीस अधीक्षकांनी घेतली.
यानंतर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती आदी विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याच्या अधिनियमान्वये (एमपीडीए कायदा १९८१, सुधारणा २००९ आणि २०१५) अमोल ईलमकरला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार केला आणि तो जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत जिल्हादंडाधिकाऱ्यांनी १७ सप्टेंबर रोजी अमोल ईलमकरला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा अंतिम आदेश काढला.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले (चंद्रपूर), उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले (मूल), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, दुर्गापूरचे ठाणेदार संतोष शेंगावकर, मूलचे ठाणेदार विजय राठोड आणि सहायक पोलीस निरीक्षक योगेश खरसान यांचा सहभाग होता. पोलिसांच्या या कठोर आणि यशस्वी कारवाईमुळे परिसरातील इतर सराईत गुन्हेगारांमध्येही धडकी भरली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.