चंद्रपुरात अभियांत्रिकी कॉलेजच्या वसतिगृहात जेवणात मेलेले उंदीर, अळ्या; विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मेसच्या जेवणातून सतत घाण निघत असल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या पायऱ्यांवर बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागात असलेल्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वसतिगृहातील मेसमधून सतत मिळणाऱ्या घाणेरड्या अन्नामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून कॉलेजच्या पायऱ्यांवर बसून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सांगितल्यानुसार, गेले अनेक दिवस मेसमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात होते. काही दिवसांपूर्वी जेवणाच्या ताटातच झुरळ सापडले होते. त्यानंतरच्या नाश्त्यात मेलेल्या अळ्या दिसल्या, तर वरणात किडे आढळले होते. हे प्रकरण इथेच थांबले नाही. आज थेट जेवणातच उंदराची विष्ठा आणि मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला.
आपल्या आरोग्याशी होत असलेला हा धोकादायक प्रकार बघून विद्यार्थ्यांनी मेसच्या जेवणावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मागील 24 तासांपासून अनेक विद्यार्थ्यांनी अन्नाला हातही न लावता कॉलेज प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन सुरू ठेवले आहे. जेवणाला हात न लावता विद्यार्थी कॉलेजच्या पायऱ्यांवरच बसून राहिले असून प्रशासनाने दखल घेईपर्यंत माघार न घेण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी याआधीही अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही. उलट, जेवणाचा पुरवठा करणाऱ्या निष्काळजी कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी कॉलेज प्रशासनच त्याची बाजू घेत असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे या कंत्राटदाराला तात्काळ हटवून विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार जेवण द्यावे, अशी ठाम मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. वारंवार तक्रारी करूनही कंत्राटदारावर कोणतीही कारवाई न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाबद्दलचा रोष अधिकच वाढला आहे.
दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता कॉलेज प्रशासनाने बेजबाबदार भूमिका घेत विचित्र स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वसतिगृहात दररोज 300 ते 400 विद्यार्थिनींसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक तयार केला जातो, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवताना एखादा किडा सापडणे ही सामान्य बाब असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जेवण बनवताना असे प्रकार होतच असतात असे सांगत प्रशासनाने या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रकरणात कॉलेज प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या तरी विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम असून जोपर्यंत कंत्राटदार बदलला जात नाही आणि स्वच्छ जेवणाची हमी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.