गांगलवाडीतील महिलेला पूजेच्या नावाखाली ९८ हजारांचा गंडा, ब्रम्हपुरीत अज्ञातांवर गुन्हा
भिक्षुकाच्या वेशात आलेल्या व्यक्तीने पूजा आणि औषधांच्या नावाखाली रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेतल्याची तक्रार आहे. ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यात एका फसवणुकीच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. गांगलवाडी येथील एका महिलेकडून पूजेच्या नावाखाली एकूण ९८ हजार रुपयांचा ऐवज घेतला गेल्याची तक्रार पोलिसांकडे आली आहे. पतीला गंभीर आजार असल्याची आणि घरावर अरिष्ट असल्याची भीती दाखवण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे.
गांगलवाडी येथील रहिवासी सौ. संध्या मनोहर मशाखेत्री (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास गावात भिक्षा मागत दोन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यातील एकाने पांढरा शर्ट, काळी लुंगी घातली होती, डोक्याला लाल फेटा बांधला होता आणि हातात मोरपिसांचा झाडू व पुस्तक होते. त्याने भिक्षा मागितली, तेव्हा मशाखेत्री यांनी त्याला १० रुपये दिले.
त्यानंतर त्या व्यक्तीने घरातील सदस्यांबद्दल विचारपूस केली. माहिती मिळताच "तुझ्या घरात किडा लागला आहे, पूजा करावी लागेल" असे सांगून त्याने विविध धार्मिक विधींचे नाटक केले, असे तक्रारीत आहे. पतीच्या उशाखाली धागा ठेवायला सांगणे, मोरपिसाने औक्षण करणे आणि राख पाण्यात टाकून ते पाणी शिंपडायला सांगणे, असे प्रकार झाले. पूजेच्या नावाखाली त्याने तात्काळ ८,००० रुपये घेतले, असेही तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे.
त्याच रात्री आरोपीने ९८५०५७६०३७ या मोबाईल क्रमांकावरून महिलेला फोन केला. "तुझ्या घरात मरेखट लागली असून त्यासाठी औषध घ्यावे लागेल" अशी भीती त्याने घातली. औषधासाठी त्याने ब्रम्हपुरी येथील "धनवंतरी आयुर्वेदिक दुकान" याचा पत्ता आणि चालकाचा संपर्क क्रमांक (९१५८४५४५५४) दिला. त्या दुकानदाराशी संपर्क साधला असता, औषध महाग असल्याचे सांगून त्याने २० हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने २० सप्टेंबर रोजी दुकानात जाऊन १५,११५ रुपयांची औषधे घेतली. पुन्हा २७ सप्टेंबर रोजी आरोपीच्या सांगण्यावरून त्याच दुकानातून २३,००० रुपयांची औषधे विकत घेतली.
त्यानंतरही आरोपीने वारंवार फोन करून घरातील अरिष्ट दूर करण्यासाठी पूजेकरिता सोन्याचे दागिने आणि रोकड मागितली. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याने महिलेला तळोधी येथील पाण्याच्या टाकीजवळ बोलावले. तेथे मोटरसायकलवरून आलेल्या या व्यक्तीने ३०,००० रुपये रोख आणि १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले. त्यात ६ ग्रॅमची एक अंगठी, ३ ग्रॅमची दुसरी अंगठी आणि ३ ग्रॅमच्या बिऱ्या यांचा समावेश होता. दर्गात पूजा करून संध्याकाळी सर्व वस्तू आणि पैसे परत करतो, असे सांगून तो दागिने व रोकड घेऊन फरार झाला, असे तक्रारीत नमूद आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मशाखेत्री यांनी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात जाऊन आपबिती सांगितली. तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४) अन्वये अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत ३८,००० रुपयांची रोख रक्कम आणि ६० हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅम सोने, असा एकूण ९८,००० रुपयांचा ऐवज नेला गेला आहे. पोलीस उपनिरीक्षक रेवणसिद्ध शहाजी कदम पुढील तपास करत आहेत.