मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:33 IST

ब्रह्मपुरीत ट्रॅव्हल्स चालकाला निवृत्त पोलीस निरीक्षकाची भररस्त्यात मारहाण, न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

ब्रह्मपुरीचे तत्कालीन ठाणेदार आणि निवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रह्मपुरीत ट्रॅव्हल्स चालकाला निवृत्त पोलीस निरीक्षकाची भररस्त्यात मारहाण, न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एफआयआर नोंदवण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ब्रह्मपुरीचे तत्कालीन ठाणेदार आणि सध्या सेवानिवृत्त असलेले पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्यावर एका ट्रॅव्हल्स बसच्या चालकाला भररस्त्यात काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. चालकाचे डोके फोडणे, त्याला शिवीगाळ करणे आणि बेकायदेशीरपणे पोलीस ठाण्यात डांबून ठेवणे या आरोपांखाली अखेर ब्रह्मपुरी पोलिसांनी गंभीर गुन्हा नोंदवला आहे.

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट, ब्रह्मपुरी यांनी फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक २८/२०२४ मध्ये दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई झाली आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी आणि नागपूरच्या हुडकेश्वर भागात राहणारे मोहन शालीकराम अडिवकर (वय ४२) हे ट्रॅव्हल्स चालक आहेत. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ते आपली बस (क्रमांक MH-49-AT-3625) घेऊन प्रवाशांसह गडचिरोलीहून नागपूरकडे निघाले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास ब्रह्मपुरी रेल्वे गेट बंद असल्यामुळे त्यांची बस इतर गाड्यांमागे थांबली होती. फाटक उघडल्यावर समोरची वाहने पुढे जात असताना मागून रॉंग साईडने एक फिक्कट आकाशी रंगाची इनोव्हा कार (क्रमांक MH-29-AR-8855) आली. त्यातून खाजगी कपड्यांत उतरलेल्या एका व्यक्तीने बस अडवत चालकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करून थांबण्याचा इशारा दिला. वाहतूक कोंडीमुळे चालकाला थांबता आले नाही, तेव्हा तो इसम इनोव्हा घेऊन ब्रह्मपुरीच्या दिशेने निघून गेला.

पावणेचार वाजण्याच्या सुमारास बस ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटल चौकात थांबली, तेव्हा तोच इसम पुन्हा बसजवळ आला आणि चालकाला खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्याचवेळी तिथे ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस फिरोज पठाण पोहोचले, आणि त्या इसमाने पठाण यांच्या दुचाकीवरची पोलीस काठी स्वतःच्या हातात घेतली. चौकशीअंती हा मारहाण करणारा इसम दुसरा कोणी नसून ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार सुधाकर अंभोरे असल्याचे स्पष्ट झाले. अंभोरे यांनी चालकाच्या पायावर आणि थेट डोक्यावर सरकारी काठीने जोरदार वार केले, ज्यात चालकाच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्त वाहू लागले. यावेळी 'इथे आमचेच राज्य चालेल' असे म्हणत त्यांनी बसमधील कंडक्टर मनीष भोयर यालाही मारहाण केली.

जखमी चालकाने जवळच्या ख्रिस्तानंद रुग्णालयात नेण्याची विनंती केली असता, अंभोरे यांनी बसमधील सर्व प्रवाशांना जबरदस्तीने उतरवले आणि रक्तबंबाळ अवस्थेतील चालकालाच गाडी चालवायला लावून पोलीस स्टेशनला नेले. तिथे त्याची अल्कोहोल टेस्ट घेण्यात आली, जी निगेटिव्ह आली. त्यानंतर एका पोलिसाने दमदाटी करून चालकाच्या मोबाईलचा लॉक नंबर घेतला आणि घटनेच्या वेळी नागरिकांनी काढलेले व्हिडिओ व पुरावे डिलीट केले. रात्री चालकाला स्वतःच्या पैशाने सीटी स्कॅन करून घ्यावे लागले. उपचारानंतर तो तक्रार द्यायला ठाण्यात गेला असता, ड्युटीवरील पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोळे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रशांत खोब्रागडे यांनी ठाणेदार अंभोरे यांची बाजू घेत तक्रार घेण्यास नकार दिला आणि त्याला हाकलून दिले.

स्थानिक पातळीवर दाद मिळत नसल्याने चालकाने उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि लोकप्रतिनिधींकडे लेखी तक्रार केली. अखेर त्याने ब्रह्मपुरी न्यायालयात कलम १५६(३) अन्वये दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानंतर ब्रह्मपुरी पोलिसांनी निवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (अश्लील कृत्य व शिवीगाळ), ३२४ (धोकादायक हत्याराने दुखापत करणे), ३४१ (बेकायदेशीर अडवणूक), ५०४ (शांतता भंगाच्या उद्देशाने अपमान) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४५(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेवणसिद्ध कदम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तक्रारदाराने आरोप केलेल्या इनोव्हा कारच्या मालकीबाबतही प्रश्न उपस्थित केले असून, एका वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ