boAt चा नवा टप्पा: प्रोजेक्टर, ग्रूमिंग आणि चार्जिंगमध्ये विस्तार, नफा ८४.५ कोटींवर
ऑडिओ आणि वेअरेबल्समध्ये ओळख कमावलेली boAt आता नव्या कन्झ्युमर टेक श्रेणी आणि परदेशी बाजारपेठांकडे वळत आहे.
ऑडिओ आणि वेअरेबल्सच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख बनवणारी भारतीय कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी boAt (बोट) आता पुढच्या टप्प्यात पाऊल टाकत आहे. प्रोजेक्टर्स, पर्सनल ग्रूमिंग, चार्जिंग सोल्यूशन्स आणि एंटरटेनमेंट व लाइफस्टाइल तंत्रज्ञान या क्षेत्रांत आपला विस्तार करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनी या टप्प्याला 'boAt 2.0' म्हणते.
या नव्या टप्प्यातही ऑडिओ हाच boAt च्या व्यवसायाचा मुख्य पाया राहणार आहे. मात्र नवीन श्रेणी आणि जागतिक बाजारपेठा हे भविष्यातील वाढीचे प्रमुख इंजिन म्हणून उभे करण्यावर जास्त भर दिला जाणार आहे.
boAt चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव नायर यांनी सांगितले, "आता आमचा भर पुनर्लाभाकडून (टर्नअराउंड) शाश्वत वाढीकडे आहे. भक्कम ताळेबंद (बॅलन्स शीट), कार्यक्षम शिस्त आणि मजबूत मूळ व्यवसायाच्या जोरावर आम्ही 'boAt 2.0' साठी सज्ज होत आहोत." ते पुढे म्हणाले, "आम्ही ऑडिओ व्यवसायातील आमचे अग्रस्थान अधिक बळकट करू. सोबतच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि प्रोजेक्टर्स, ग्रूमिंग व चार्जिंग सोल्यूशन्स यांसारख्या नवीन कन्झ्युमर तंत्रज्ञान श्रेणींमधील वाढीवर आमचा विशेष भर असणार आहे. boAt ला भारतातील एक दीर्घकाळ टिकणारी मोठी तंत्रज्ञान कंपनी बनवणे हे आमचे ध्येय आहे."
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीने आपला ताळेबंद आणि नफ्याची क्षमता अधिक मजबूत केली आहे. त्यानंतरच विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. करांनंतरचा boAt चा नफा ३८ टक्क्यांनी वाढून ८४.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनी आता पूर्णपणे बँक कर्जमुक्त झाली असून तिच्याकडे सुमारे ३९७ कोटी रुपयांची रोकड राखीव असल्याचे सांगितले जात आहे. नायर यांनी स्पष्ट केले की, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचे संपूर्ण लक्ष बाह्य आव्हानांना तोंड देणे आणि boAt चा पाया अधिक बळकट करणे यावर होते.
नव्या क्षेत्रांचा वाटाही आता वाढू लागला आहे. चार्जिंग सोल्यूशन्स, केबल्स आणि गेमिंगसह कंपनीच्या इतर व्यवसायांचा विभागीय नफा आर्थिक वर्ष २६ मध्ये सुमारे १४ कोटी रुपयांवरून ४६ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.
वेअरेबल्स व्यवसायातही चांगला बदल दिसला. एका वर्षापूर्वी या विभागाला सुमारे ५४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर आर्थिक वर्ष २०२६ मध्ये या विभागाने सुमारे ७ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. नायर म्हणाले, "ऑडिओ क्षेत्रात आमचे नेतृत्व अधिकच बळकट होत आहे. 'वेअरेबल्स'चा व्यवसाय फायदेशीर ठरला आहे आणि नवीन श्रेणींमुळेही चांगल्या महसुलाच्या व नफ्याच्या संधी निर्माण होत आहेत."
भारताबाहेरही boAt आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचा आंतरराष्ट्रीय महसूल सुमारे २० कोटी रुपयांवरून ४५ कोटी रुपयांवर गेला. एकूण व्यवसायात याचा वाटा सध्या छोटा असला, तरी कंपनी याकडे भविष्यातील वाढीची चांगली संधी म्हणून पाहते. ऑडिओमध्ये तयार झालेली ब्रँडची ओळख, वितरणाचे जाळे आणि ग्राहकांच्या आवडीनिवडींची समज यांचा वापर आता इतर तंत्रज्ञान श्रेणींमध्ये करण्याची boAt ची रणनीती आहे.