मुंबईत ज्येष्ठ नागरिकाकडून ४ कोटी उकळल्याचा आरोप; ५ लाख घेताना महिलेला अटक
व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग आणि अश्लील चित्रीकरण पुढे करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप असलेल्या महिलेला पोलिसांनी पाच लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले.
मुंबई : व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग आणि अश्लील चित्रीकरण पुढे करून एका ज्येष्ठ नागरिकाला ब्लॅकमेल केल्याचा आणि त्यांच्याकडून तब्बल ४ कोटी रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. आणखी पाच लाख रुपयांची मागणी झाल्यावर मात्र या ज्येष्ठ नागरिकाने थेट पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन आरोपी महिलेला पाच लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले आणि तिला अटक केली.
नाझिया महेमूद शेख ऊर्फ नाजनीन असे आरोपी महिलेचे नाव आहे. फिर्यादी हे आपल्या नातेवाईकाच्या घाटकोपर येथील सोन्याच्या पेढीवर व्यवस्थापक म्हणून काम करतात. २०२० मध्ये आरोपी महिला एका दुसऱ्या महिलेसोबत या पेढीवर आली होती. तेव्हापासून तिची फिर्यादींशी ओळख वाढत गेली आणि २०२४ पासून दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले.
तक्रारीनुसार, २०२४ मध्ये नाझियाने व्हॉट्सअॅपवरून व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी अश्लील व्हिडिओ चॅटिंग केले. काही दिवसांनी हे व्हिडिओ सगळीकडे पसरवण्याची धमकी देऊन तिने त्यांच्याकडून काही पैसे उकळले. त्यानंतर काही दिवसांनी तिने सांगितले की, हे अश्लील चॅटिंग इंटरनेटवरून पोलिस, न्यायालय आणि सी.बी.आय. यांच्यापर्यंत पोहोचले आहे आणि त्याच्या चौकशीसाठी तिला बोलावण्यात आले आहे. या धमकीमुळे बदनामीच्या भीतीने फिर्यादी पैसे देत राहिले. अशा प्रकारे २०२४ पासून आतापर्यंत त्यांच्याकडून एकूण ४ कोटी रुपये उकळण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.
पुढे काही दिवसांनी हे चित्रीकरण मद्रास पोलिसांकडे पोहोचले असून, प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी ५ लाख रुपये मागितले आहेत, अशी थाप तिने मारली. आता पैसे मिळणार नाहीत, अशी शंका आल्यावर नाझियाने हात-पाय तोडून ठार मारण्याची धमकी दिली. पैसे वारंवार उकळले जात होते आणि न दिल्यास जीवे मारण्याची धमकी मिळत होती. त्यामुळे आता थेट पोलिस ठाण्यात जावे, असा विचार करून फिर्यादी पोलिस ठाण्यात गेले आणि त्यांनी तक्रार दाखल केली.
तक्रार नोंदवली जात असतानाच नाझियाचा फोन आला. फोन स्पीकरवर ठेवला असल्याने पोलिसांनीही तो ऐकला. खंडणी मागणारा हा फोन स्वतः ऐकल्यावर पोलिसांनी तातडीने हालचाल केली. फिर्यादींच्या मार्फत त्यांनी या महिलेला एच. बी. एस. मार्गावरील राधाकृष्ण हॉटेलजवळच्या एका ठिकाणी पैसे घेण्यासाठी बोलावले. काही खऱ्या आणि काही बनावट नोटा मिळून ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना आरोपी महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई घाटकोपर विभागाच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.