स्क्वॅश: सेंथिलकुमारने चेक ओपन जिंकली, फायनलमध्ये टॉप सीड लोबनला हरवले
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारताच्या वेलावन सेंथिलकुमारने अंतिम फेरीत स्कॉटलंडच्या ग्रेग लोबनचा 13-11, 11-5, 8-11, 11-7 असा पराभव करून चेक ओपनचे जेतेपद मिळवले.
भारताचा स्क्वॅशपटू वेलावन सेंथिलकुमार याने यूएसडी 35,000 च्या चेक ओपन स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावावर केले. अंतिम फेरीत त्याने स्कॉटलंडचा टॉप सीड असलेला ग्रेग लोबन याचा पराभव केला. ही स्पर्धा पीएसए कॉपर-लेव्हलची होती.
सेंथिलकुमार या स्पर्धेत चौथ्या सीडवर होता आणि सध्या जागतिक क्रमवारीत त्याचा 42 वा क्रमांक आहे. लोबन जागतिक क्रमवारीत 31 व्या क्रमांकावर आहे. अंतिम सामना सेंथिलकुमारने 13-11, 11-5, 8-11, 11-7 असा जिंकला. हे त्याचे 12 वे पीएसए टूर टायटल ठरले, तर कॉपर लेव्हलवरचे दुसरे टायटल. याच कॅटेगरीतले त्याचे पहिले टायटल त्याने ऑगस्टमध्ये बुडापेस्ट ओपनमध्ये जिंकले होते.
ट्रॉफीपर्यंतचा त्याचा रस्ता सोपा नव्हता, कारण त्याला कठीण ड्रॉचा सामना करावा लागला. दुसऱ्या फेरीत ब्राझीलच्या डिएगो गोब्बीवर विजय मिळवून त्याने स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा आठवा सीड जेरेमियास अजान याच्यावर त्याने 11-3, 11-8, 11-7 अशी मात केली.
हीच लय त्याने पुढच्या सामन्यांतही कायम ठेवली. उपांत्य फेरीत त्याची गाठ फ्रान्सच्या ऑगस्टे डूसॉर्ड याच्याशी पडली. हा सामना सेंथिलकुमारने 11-7, 12-10, 11-1 असा जिंकला आणि अंतिम फेरीतली आपली जागा पक्की केली.
दुसरीकडे लोबनही चांगल्या फॉर्मात होता. त्याने फ्रान्सच्या तौफिक मेखाल्फीला सरळ सेटमध्ये हरवून फायनल गाठली. त्यामुळे स्पर्धेतला टॉप सीड आणि चौथा सीड यांच्यातला सामना अंतिम फेरीत ठरला.
सेंथिलकुमारसाठी फायनल ही कठीण परीक्षाच होती, विशेषतः पहिल्या गेममध्ये, जो अगदी शेवटपर्यंत चालला. हा गेम त्याने हिंमत न सोडता 13-11 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये त्याचे नियंत्रण जास्त होते आणि तो गेम 11-5 असा त्याच्या नावावर झाला. तिसऱ्या गेममध्ये लोबनने पुनरागमन करत 11-8 असा विजय मिळवला. पण सेंथिलकुमारने स्वतःला सावरले आणि चौथा गेम 11-7 असा जिंकून ट्रॉफी उचलली.
चेक ओपनआधी सेंथिलकुमारने जपानमधील आयची-नागोया इथे आयोजित केलेल्या एशियन गेम्स 2026 मध्ये चांगली कामगिरी केली होती. तिथे त्याने दोन ब्रॉन्ज मेडल जिंकली होती. चेक ओपनमधले हे यश पीएसए टूरमधल्या त्याच्या कामगिरीतले सातत्य दाखवते. अशा प्रकारे तो लॉस अँजिल्स 2028 गेम्समध्ये या खेळाच्या ऑलिम्पिक पदार्पणाच्या दिशेने आगेकूच करत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.