बोर्डा येथे आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू, 1058 खेळाडू सहभागी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांना बोर्डा येथे सुरुवात झाली.
चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्यांना प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, या उद्देशाने प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांना आज (दि. 2) शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा, बोर्डा येथे उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात सुरुवात झाली.
स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, दंत व मुखरोग तज्ज्ञ डॉ. संदीप पिपरे, उमेश कडू आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात आणि महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले, महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण झाले आणि क्रीडाज्योत पेटवून स्पर्धांच्या औपचारिक प्रारंभाची घोषणा करण्यात आली. वेगवेगळ्या बीटनुसार आलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत 62 आश्रमशाळा व वसतिगृहांमधील जवळपास 8 हजार विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली होती. त्याबद्दल दंतरोग व मुखरोग तज्ज्ञ डॉ. संदीप पिपरे यांचा या वेळी गौरव करण्यात आला.
शासकीय आश्रमशाळा, बोर्डा येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर केले. या नृत्याने उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांची मने जिंकली. आदिवासी समाजाची समृद्ध लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि लोकजीवन यांचे सुंदर दर्शन या सादरीकरणातून घडले.
प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी क्रीडा स्पर्धांचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीइतकेच शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांनाही महत्त्व आहे, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करावा, योग्य आहार घ्यावा आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. मिलिंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. क्रीडा स्पर्धा आणि आंतरप्रकल्पीय उपक्रमांतून संस्कृती, अनुभव आणि ज्ञान यांची देवाणघेवाण होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडते, याबद्दल त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात कल्पना क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम आणि स्पर्धा सातत्याने होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी केवळ जिंकण्यासाठी स्पर्धेत उतरू नये, तर नवी कौशल्ये शिकण्यासाठी, स्वतःची क्षमता ओळखण्यासाठी आणि खिलाडूवृत्ती जोपासण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
उद्घाटन सोहळ्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत 17 वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना खेळवण्यात आला. हा सामना बोर्डा केंद्र विरुद्ध देवाडा केंद्र यांच्यात झाला. तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात एकूण 1058 खेळाडू विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांच्या व्यवस्थेसाठी जवळपास 200 अधिकारी-कर्मचारी आणि सहाय्यक मनुष्यबळ काम करत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजीव बोंगीरवार (शिक्षण) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. प्रकल्प क्रीडा समन्वयक सुरेश श्रीरामे यांनी स्पर्धांचे नियोजन आणि समन्वय यांची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा लाड यांनी केले, तर रामदास खवशी यांनी आभार मानले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.