भाईंदरच्या सोनल पार्कमधील शिवसेनेच्या कंटेनरवरून वाद, भाजप नगरसेवक तरुण शर्मांचा आरोप
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भाईंदर पूर्वेतील सोनल पार्क परिसरात ठेवलेल्या शिवसेनेच्या कंटेनरचा गैरवापर होत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक तरुण शर्मा यांनी केला आहे. त्यांनी नवघर पोलीस ठाण्याकडे लेखी मागणी केली आहे.
भाईंदर पूर्वेतील सोनल पार्क परिसरात एका खासगी जागेवर शिवसेनेचे काही कंटेनर ठेवलेले आहेत. या कंटेनरवरून आता तिथले राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे नगरसेवक तरुण शर्मा यांनी गंभीर आरोप केला आहे. लोकांच्या सामाजिक कामासाठी आणलेल्या या कंटेनरचा वापर भलत्याच कामांसाठी होतो आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, यातल्या एका कंटेनरमध्ये डेकोरेशनचे साहित्य भरून ठेवलेले दिसले. दुसऱ्या कंटेनरमध्ये काही तरुणांचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा केला जातोय. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मुळात हे कंटेनर शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिले होते. पण महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी ते आधीच्या जागेवरून हलवून सोनल पार्कमधल्या खासगी जागेवर आणून ठेवले गेले. आता त्यांचा वापर सामाजिक कामासाठी होत नाही, तर पूर्णपणे खासगी आणि संशयास्पद कारणांसाठी होतो, असा आरोप केला जातोय.
तरुण शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कंटेनरमध्ये लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमांचे डेकोरेशन साहित्य ठेवले आहे. त्यासाठी जागामालकाला अडीच ते तीन हजार रुपये भाडे दिले जात असल्याची चर्चा आहे. त्याहून गंभीर म्हणजे, दुसऱ्या कंटेनरमध्ये तरुण-तरुणी अश्लील कृत्य करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे.
या प्रकारावर शर्मा यांनी संताप व्यक्त केला. "लोकांच्या सेवेसाठी आणलेल्या कंटेनरचा असा गैरवापर होत असेल, तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे," असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
वादाचा आणखी एक मुद्दा म्हणजे या कंटेनरवर शिवसेनेचे अधिकृत बॅनर लावलेले आहे. त्यावर हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांची छायाचित्रे झळकत आहेत. थोर नेत्यांच्या प्रतिमा असलेल्या साहित्याचा असा गैरवापर होत असल्याने शिवप्रेमींमध्येही संताप आहे.
या सगळ्या प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी करावी, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि हे वादग्रस्त कंटेनर सोनल पार्क परिसरातून तात्काळ हटवावेत, अशी मागणी नगरसेवक तरुण शर्मा यांनी केली आहे. ही मागणी त्यांनी नवघर पोलीस ठाण्याकडे लेखी स्वरूपात दिली आहे.
दरम्यान, या प्रकारावर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे शिवसेना यावर काय भूमिका घेणार आणि विरोधकांच्या आरोपांना काय उत्तर देणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.