भाईंदरमध्ये एमडी ड्रग्ज तस्करी करताना पोलीस हवालदार प्रकाश पवार साथीदारासह पकडला
भाईंदर पूर्वेला पोलीस हवालदार प्रकाश पवार आणि अखिलेश कुमार यांना एमडी ड्रग्जची तस्करी करताना रंगेहाथ अटक झाली आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्ते सुशांत पवार यांनी पोलीस आयुक्तांवर टीका केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पुन्हा एकदा पोलीस दलाचीच नाचक्की झाली आहे. भाईंदर पूर्वेला पोलीस हवालदार प्रकाश पवार याला त्याचा साथीदार अखिलेश कुमार याच्यासह एमडी ड्रग्जची तस्करी करताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे.
हे आयुक्तालय दुसऱ्या राज्यांत जाऊन कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याचा गाजावाजा करते. मात्र स्वतःच्या हद्दीत काय चालले आहे, याकडे लक्ष नाही, असे म्हणतात त्याप्रमाणे 'दिव्याखाली अंधार' असल्याचे यातून पुन्हा दिसले, असा संताप व्यक्त होत आहे. नयानगरच्या प्रमोद केंद्रे याच्या ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणाची चर्चा अजून थांबलेली नसतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे.
यापूर्वी नयानगर पोलीस ठाण्यातील अंमलदार प्रमोद केंद्रे याने लातूरमधील स्वतःच्या शेतात एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू केल्याचे उघड झाले होते. आता भाईंदर पूर्वेला हवालदार प्रकाश पवार आणि अखिलेश कुमार हे मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करताना सापडले. पोलिसांचा गुन्ह्यांतील सहभाग आता एखादा अपवाद राहिला नसून ती एक साखळी झाल्याचे धक्कादायक चित्र आहे, असे म्हटले जात आहे. वर्दीआडून चालणारा हा काळा धंदा चव्हाट्यावर आल्याने शहरात तीव्र संताप आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुशांत पवार यांनी पोलीस आयुक्तांवर जोरदार टीका केली आहे. तस्करी रोखता येत नसेल, तर आयुक्तांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून लगेच पद सोडावे, असे ते म्हणाले. 'रक्षकच भक्षक बनून तरुण पिढीला नशेच्या खाईत लोटत असतील, तर शहराला कोण वाचवणार?', असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
फक्त हवालदार पातळीवरचेच कर्मचारी नव्हे, तर आयुक्तालयातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचेही ड्रग्ज तस्करांशी जवळचे आणि संशयास्पद संबंध असल्याची चर्चा दलात आणि शहरात उघडपणे सुरू आहे. अमली पदार्थांविरोधात कारवाईचा फक्त देखावा करायचा आणि आतून ड्रग्ज माफियांना अभय द्यायचे, असा संशय बळावला आहे.
अशा घटनांमुळे दिवस-रात्र प्रामाणिकपणे ड्युटी करणाऱ्या हजारो पोलिसांच्या कष्टावर आणि खाकीच्या प्रतिष्ठेवर पाणी फिरते, असे सुशांत पवार यांचे म्हणणे आहे. फक्त तात्पुरती चौकशी, निलंबन किंवा बदल्या करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या आणि तस्करांशी हातमिळवणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खाकी वर्दीत ठेवण्याचा अधिकार नाही, त्यांना थेट सेवेतून बडतर्फ करावे, अशी त्यांची मागणी आहे.
आयुक्तांनी संपूर्ण आयुक्तालयाची झाडाझडती घ्यावी आणि ड्रग्ज रॅकेट मुळापासून उखडून टाकावे, असेही पवार यांनी म्हटले आहे. स्वतःच्या खात्यातील तस्करी आणि भ्रष्टाचार रोखता येत नसेल, तर त्यांनी तत्काळ निघून जावे. खात्यातील या काळ्या कारभाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि पत्रकारांना 'अँटी पोलीस' ठरवून खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचे कट रचण्यापेक्षा, स्वतःच्या खात्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून दाखवावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.