राहुल गांधींवरील टीकेवरून यशोमती ठाकूर यांचा बावनकुळेंना इशारा, जिभेवर ताबा ठेवण्याचा सल्ला
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर संतापल्या, त्यांनी बावनकुळेंना थेट इशारा दिला.
राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जोरदार पलटवार केला आहे. "बावनकुळे साहेब, जरा तुमच्या जिभेवर लगाम आणा. पुन्हा अशी भाषा वापरली तर तुमची गाठ सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी आहे," असा थेट इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केली होती. "राहुल गांधी सठिया गेले आहेत, त्यांचा बुद्धिभ्रंश झाला आहे आणि त्यांना नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे," असे वादग्रस्त वक्तव्य बावनकुळे यांनी केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे आणि देशाने राहुल गांधींना नाकारले आहे, असेही बावनकुळे म्हणाले होते.
या विधानावर प्रतिक्रिया देताना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, "चंद्रशेखर बावनकुळे हे एक गंभीर राजकीय नेते असून ते वैचारिक पातळीवर ही लढाई लढतील असे वाटले होते; मात्र ते चक्क वैयक्तिक पातळीवर येऊन बोलत आहेत. राहुल गांधी हे देशाच्या संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत आणि ज्या गांधी-नेहरू घराण्याने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्या घराण्याचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारे वैयक्तिक टीका करण्याइतकी बावनकुळेंची राजकीय उंची नाही."
पुढे बोलताना यशोमती ठाकूर यांनी सरकारवरही टीका केली. त्या म्हणाल्या, "देशातील व राज्यातील वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि जनतेच्या मूळ प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांकडे बोलायला काहीच नाही. पुण्यात झालेला 'छात्रों की बात' कार्यक्रम आणि इंदूरचा राहुल गांधींचा कार्यक्रम विरोधकांच्या डोळ्यात खुपला असून तो त्यांना सहन झालेला नाही; म्हणूनच ते अशी वैयक्तिक चिखलफेक करत आहेत."
पालकमंत्र्यांनी घेतलेल्या जनता दरबारावरही ठाकूर यांनी बोट ठेवले. त्या म्हणाल्या, "नुकत्याच घेतलेल्या जनता दरबारात दोन-दोन हजार नागरिक निवेदने घेऊन हजर झाले, यावरूनच जनता सरकारवर किती नाराज आणि असंतुष्ट आहे हे उघड होते. शेतकऱ्यांच्या शेतातील वीज गायब आहे, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढल्याने पिकांची नासाडी होत आहे, पण अशा गंभीर विषयांकडे शासनाचे लक्ष नाही."
शेवटी ॲड. ठाकूर यांनी बावनकुळेंना ताकीद देत म्हटले, "तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जबाबदार मंत्री आहात, पदाची गरिमा बाळगा. पातळी सोडून विधाने करणे बंद करा; अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते शांत बसणार नाहीत आणि जशास तसे उत्तर दिले जाईल."