राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्यामागे दोन लाखांची सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय
बारामतीतील उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरील हल्ल्याच्या तपासात दोघांना अटक झाली असून एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेतले आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बारामतीतील उद्योजक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या सशस्त्र हल्ल्याच्या तपासातून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. सूर्यवंशी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पार्थ वासुदेव अवथळे (वय 19) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय 50) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय एका विधिसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे बारामती आणि आसपासच्या परिसरातील व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पालखी महामार्गावरील पायलट ढाब्यासमोर सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला. लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून 19 ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
हल्ल्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला. पुणे शहर पोलिसांनी पार्थ अवथळे आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशी आणि तांत्रिक तपासातून ज्ञानदेव शिंदे याने हल्ल्यासाठी दोन लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली, असे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार अवथळे आणि शिंदे या दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासातील प्राथमिक माहितीनुसार, सूर्यवंशी आपल्या ताफ्यासह बारामती परिसरात आले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आपण त्यांचे चाहते असल्याचे सांगितले आणि छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच बहाण्याने जवळ आलेल्या एका हल्लेखोराने पिस्तूल काढल्याचे समोर आले आहे. पिस्तूल जाम झाल्यामुळे गोळी झाडली गेली नाही, अशी माहिती आहे. त्यानंतर सूर्यवंशी यांनी प्रतिकार केला असता हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस अंगरक्षकाने आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत एका आरोपीने त्याच्या हाताला चावा घेतला आणि त्यानंतर आरोपी पसार झाले.
राणा सूर्यवंशी हे राणा शिपिंग कंपनीचे मालक आहेत. महाराष्ट्रासह गोव्यातही त्यांचे व्यावसायिक कामकाज आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, दोन लाखांच्या व्यवहाराचे स्वरूप काय आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.