उरलेल्या चपातीपासून घरीच बनवा चटपटीत व्हेज फ्रँकी, मुलांसाठी उत्तम पर्याय
जेवणानंतर उरलेली चपाती फेकून देण्याऐवजी तिची फ्रँकी करता येते. साहित्य आणि कृती इथे दिली आहे.
जेवण झाल्यावर घरात दोन-चार चपात्या उरतात, असं अनेकदा होतं. त्याच चपात्या पुन्हा खायचा कंटाळा येतो आणि मग बऱ्याचदा त्या फेकून दिल्या जातात. पण या उरलेल्या चपात्यांपासून एक नवा पदार्थ तयार करता येतो.
रोजच्या जेवणानंतर चपाती उरली की दुसऱ्या दिवशी तिचं काय करायचं, असा प्रश्न अनेकदा पडतो. ती पुन्हा गरम करून खाण्यापेक्षा तिची चटपटीत आणि स्वादिष्ट फ्रँकी करता येते. बाजारात मिळणाऱ्या स्ट्रीट स्टाईल फ्रँकीसारखी चव घरच्या घरी हवी असेल, तर योग्य मसाले, ताज्या भाज्या आणि चटणी वापरणं महत्त्वाचं आहे. चपातीचा बेस आधीच तयार असल्यामुळे वेळही वाचतो.
सकाळचा नाश्ता, संध्याकाळची भूक किंवा मुलांचा डबा, या तिन्हींसाठी ही चपाती फ्रँकी चांगला पर्याय ठरू शकते. आवडीप्रमाणे त्यात पनीर, चीज, अंडे किंवा वेगवेगळ्या भाज्याही घालता येतात.
साहित्य असं लागेल: उरलेल्या चपात्या ४, बारीक चिरलेला कांदा १, बारीक चिरलेली शिमला मिरची १, बारीक चिरलेलं गाजर १, उकडलेला बटाटा १ आणि अर्धा कप बारीक चिरलेला कोबी.
मसाल्यांसाठी आले-लसूण पेस्ट १ चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि चाट मसाला अर्धा चमचा घ्यायचा आहे. याशिवाय टोमॅटो सॉस १ चमचा, हिरवी चटणी २ चमचे, लिंबाचा रस १ चमचा, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तेल आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल.
सुरुवातीला कढईत थोडं तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट घाला. कांदा थोडा परतला की शिमला मिरची, गाजर आणि कोबी घालून मध्यम आचेवर भाज्या परतून घ्या.
भाज्या थोड्या मऊ झाल्या की उकडलेला बटाटा हाताने कुस्करून त्यात घाला. मग हळद, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ टाका. सगळं नीट एकत्र करून २ ते ३ मिनिटं परता. त्यानंतर टोमॅटो सॉस आणि थोडा लिंबाचा रस घालून मिश्रण चांगलं ढवळा. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करा. फ्रँकीचं सारण फार ओलं ठेवू नका.
आता तवा गरम करून त्यावर उरलेली चपाती ठेवा आणि दोन्ही बाजूंनी हलकी गरम करून घ्या. चपाती जास्त वेळ भाजू नका, नाहीतर ती कडक होऊ शकते. गरम चपातीवर हिरवी चटणी पसरवा आणि तयार भाजीचं सारण मध्यभागी ठेवा. आवडत असेल तर वरून थोडा चाट मसाला किंवा किसलेलं चीजही घालता येतं.
चपातीच्या दोन्ही बाजू थोड्या आत दुमडून तिचा घट्ट रोल करा. सारण बाहेर पडणार नाही, याची काळजी घ्या. रोल बटर पेपर किंवा फॉइलमध्ये गुंडाळला तर तो खायला सोपा जातो.
शेवटी तयार फ्रँकी पुन्हा तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी १-२ मिनिटं हलकी भाजून घ्या. बाहेरून थोडी कुरकुरीत आणि आतून मसालेदार झाली की गरमागरम खायला द्या.