शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

अमरावतीच्या फ्लाइंग अकादमीला मान्यता, ३४ विमाने सज्ज; पहिल्या तुकडीत १८० प्रशिक्षणार्थी

अमरावतीच्या फ्लाइंग अकादमीला मान्यता, ३४ विमाने सज्ज; पहिल्या तुकडीत १८० प्रशिक्षणार्थी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिक्षण PT24 टीम

बेलोरा विमानतळावरील एअर इंडिया फ्लाइंग अकादमीचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. डीजीसीएने अधिकृत मान्यता दिल्याने प्रशिक्षण सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमरावतीतील एअर इंडिया फ्लाइंग अकादमीचा (एफटीओ) प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. बेलोरा विमानतळावर उभ्या राहत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. देशातील विमान वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देणारा आणि विदर्भाच्या विकासातला महत्त्वाचा टप्पा, असे या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.

वैमानिक प्रशिक्षणासाठी लागणारी सगळी ३४ विमाने बेलोरा विमानतळावर पोहोचली आहेत. त्यात ३१ सिंगल इंजिन 'पायपर आर्चर' आणि तीन ट्विन इंजिन 'डायमंड डीए ४२ एनजी' या आधुनिक विमानांचा समावेश आहे. आता डीजीसीएने अकादमीला अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रशिक्षण सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया यांच्या संयुक्त सहकार्याने हे केंद्र उभारले जात आहे. हे केंद्र दक्षिण आशियातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे. या अकादमीमुळे देशातील भावी वैमानिकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण महाराष्ट्रातच घेण्याची संधी मिळणार आहे.

प्रशासकीय आणि परिचालनविषयक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर येत्या महिनाभरात प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू करण्याचे नियोजन आहे. पहिल्या तुकडीत एकूण १८० प्रशिक्षणार्थी घेतले जाणार आहेत.

व्यावसायिक वैमानिक परवाना, म्हणजेच कमर्शियल पायलट लायसन्स, मिळवण्यासाठीचा अभ्यासक्रम १८ महिन्यांचा असेल. या काळात प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला प्रत्यक्ष विमानातून २०० तासांचे उड्डाण प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. त्यातले १८५ तास सिंगल इंजिन विमानातून असतील, तर मल्टिइंजिन विमानातूनही उड्डाण प्रशिक्षण दिले जाईल.

तज्ज्ञांच्या मते, अमरावतीतले अनुकूल हवामान वर्षातले किमान ३०० दिवस उड्डाण प्रशिक्षणाला पोषक राहू शकते. त्यामुळे वैमानिक प्रशिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून अमरावती पुढे येईल, अशी अपेक्षा आहे.

अकादमीचा परिसर १० एकरांवर पसरलेला आहे. तिथे प्रशिक्षणार्थींसाठी वसतिगृह, भोजनगृह, अत्याधुनिक वर्गखोल्या, ब्रिफिंग रूम आणि हँगर आहेत. विमानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष उड्डाणापूर्वी सराव करण्यासाठी तीन फ्लाइट सिम्युलेटर उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी दोन सिंगल इंजिनचे आणि एक मल्टिइंजिनचे आहे. प्रशिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी प्रत्येक फ्लाइट इन्स्ट्रक्टरकडे फक्त सहा प्रशिक्षणार्थी असतील, असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.

#नागपूर#पढ़ाई#PT24#Education#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ