अहिल्यानगरमध्ये 93 लाखांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक; दोन साथीदार फरार
स्थानिक गुन्हे शाखेने वडगाव गुप्ता परिसरात छापा टाकून 500 रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या.
अहिल्यानगरमध्ये बनावट नोटा देऊन लोकांना फसवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 93 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय चलनाच्या बनावट नोटांचा मोठा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अहिल्यानगरमधील वडगाव गुप्ता परिसरात छापा टाकला.
या कारवाईत गणेश शेवाळे, सुमित चंदनशिवे आणि सूरज कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे तिघे आरोपी बारामतीचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 500 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. या सर्व नोटांची एकूण किंमत 93 लाख रुपये आहे. एवढा मोठा साठा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक तपासात पोलिसांना आणखी एक गोष्ट कळली आहे. आरोपी श्रद्धाळू लोकांना आणि इतर नागरिकांना वेगवेगळी आमिषे दाखवून फसवत होते, असे तपासात समोर आले आहे. "तुमच्यावर पैशांचा पाऊस पाडू" आणि "तुमचे पैसे दुप्पट करून देऊ" अशी आश्वासने संबंधितांना दिली जात होती.
या आमिषाला बळी पडलेल्यांकडून आरोपी आधी खरे पैसे घेत होते. त्यानंतर बनावट नोटांचा पाऊस पाडल्याचे किंवा पैसे दुप्पट झाल्याचे भासवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपींनी बनावट नोटांबद्दलही माहिती दिली आहे. या नोटा त्यांनी 25 हजार रुपये देऊन मालेगाव येथून आणल्या, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यावरून आता नोटांचा स्रोत आणि त्यामागचे संपूर्ण नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या नोटा नेमक्या कुठे तयार केल्या जात होत्या, त्यामागे आणखी कोण आहे आणि नेटवर्कमध्ये किती जण आहेत, याचाही तपास सुरू आहे.
तिघा आरोपींना अटक झाली असली तरी टोळीतील आणखी दोन साथीदार अजूनही फरार असल्याची माहिती आहे. हे दोघे अहिल्यानगर शहरातील असल्याचे समोर आले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके काम करत असून त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या टोळीने आतापर्यंत किती नागरिकांना अशा पद्धतीने फसवले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच जप्त केलेल्या नोटांपैकी काही नोटा आरोपींनी यापूर्वी बाजारात चलनात आणल्या आहेत का, याचीही चौकशी पोलीस करत आहेत.