मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:46 IST

Ahilyanagar Crime: 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! चिडवल्याच्या रागातून हल्ला; दोघांचा मृत्यू तर 6 गंभीर

Ahilyanagar Crime: 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! चिडवल्याच्या रागातून हल्ला; दोघांचा मृत्यू तर 6 गंभीर
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी भागातल्या विळद घाट इथल्या मातोश्री वृद्धाश्रमात पहाटेच्या वेळी एक धक्कादायक घटना घडली. या वृद्धाश्रमातच राहणाऱ्या राजू घुले नावाच्या व्यक्तीने आपल्याच सोबत राहणाऱ्या इतर वृद्धांवर धारदार हत्याराने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात दोन वृद्धांचा जागीच मृत्यू झाला, तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजू घुले हा मातोश्री वृद्धाश्रमातच वास्तव्यास होता. साधारण सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घुले याने अचानक टोकाचं पाऊल उचलत हा हल्ला केला. हल्ला इतका अनपेक्षित आणि जोरदार होता की वृद्धांना स्वतःचा बचाव करायला किंवा पळून जायला वेळच मिळाला नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

या अचानक झालेल्या हल्ल्यात महाकाळेश्वर बाबुराव हेणे (वय 60) आणि दत्तात्रेय शंकर हारके (वय 85) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश छबु घोडके (वय 60), बाळासाहेब अंबादास घाडगे (वय 67), गोरख नारायण फुंदे (वय 75), साहेबराव दगडू भवर (वय 63), लिंबराज दामोदर पिस्के (वय 80) आणि संतोष ब्रिंगल (वय 60) हे सहाजण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचं पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपी राजू घुले याला ताब्यात घेतलं. हल्ल्यासाठी वापरलेलं हत्यारही पोलिसांनी जप्त केलं आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, चिडवल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी अहिल्यानगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या हे सर्व जखमी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. यातल्या एका जखमीची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

याबाबत बोलताना पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे म्हणाले, "मातोश्री वृद्धाश्रमात राजू घुले याने पहाटेच्या सुमारास हा हल्ला केला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून जखमींवर उपचार चालू आहेत. हा हल्ला नक्की कोणत्या कारणातून झाला, यामागे काही जुना वाद होता का, हे शोधण्यासाठी कसून चौकशी सुरू आहे."

या घटनेनंतर वृद्धाश्रमातील इतर वृद्ध दहशतीच्या वातावरणात असून पोलीस प्रशासनाकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ