आत्मसमर्पण केलेल्या नक्षली कमांडरचा दावा- शाळा, कॉलेजांमधून तरुणांची भरती केली
एमएमसी झोनचा नक्षली कमांडर विकास उर्फ अनिल रामास्वामी मेकला याने आत्मसमर्पणानंतर पोलीस चौकशीत आणि माध्यमांशी बोलताना राज्यातील शाळा-कॉलेजांमधून तरुणांना चळवळीत ओढल्याची कबुली दिली.
जंगलातला नक्षलवाद मागे पडला असला, तरी महाराष्ट्राच्या शहरी भागात ही चळवळ अनेक वर्षांपासून हळूहळू आणि छुप्या पद्धतीने पाय पसरत असल्याचा दावा एका आत्मसमर्पण केलेल्या नक्षली कमांडरने केला आहे. नक्षलवाद्यांच्या एमएमसी म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड झोनचा प्रमुख असलेला विकास उर्फ अनिल रामास्वामी मेकला याने काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पणानंतर पोलीस चौकशीत त्याने अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या. माध्यमांशी बोलताना त्याने सांगितले की, शालेय आणि कॉलेजच्या शिक्षणासाठी तो महाराष्ट्रातील अनेक शहरांत राहिला आणि मुंबईत कॉलेजचे शिक्षण घेत असताना त्याने अनेक तरुणांना नक्षलवादी चळवळीकडे वळवल्याचे कबूल केले.
विकासचे मूळ नाव विनोद रामास्वामी मेकला असून तो तेलंगणातील चिंताकुंटा या गावचा रहिवासी आहे. त्याचे आई-वडील दोघेही आधीपासूनच सशस्त्र नक्षल चळवळीशी जोडलेले असल्यामुळे वयाच्या चौथ्या वर्षापासून विकास जंगलात नक्षलवाद्यांसोबतच राहिला. गणपती नावाच्या नक्षली चळवळीतील सर्वोच्च नेत्याच्या सान्निध्यातच त्याचे बालपण गेले. लहानपणी तो आई-वडिलांसह जंगलातील दलममध्ये राहत होता. शाळेत जाण्याचे वय झाल्यावर तत्कालीन नक्षली नेतृत्वाने त्याला शिक्षणासाठी महाराष्ट्रातील शहरांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विकासने राज्यातील वेगवेगळ्या शहरांत राहून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण पूर्ण केले.
त्याचे प्राथमिक शिक्षण छत्रपती संभाजीनगर भागात झाले. ज्या नक्षलवाद्यांच्या छुप्या डेनमध्ये राहून तो तिथे शिकत होता, त्यांच्यापैकी काही जण पोलिसांच्या हाती लागल्याने त्याच्या शिक्षणात मध्येच खंड पडला. तरीही कधी जिल्हा परिषदेच्या शाळेत तर कधी खासगी शाळेत राहून त्याने चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरातील राजारामपुरी भागातील सरकारी शाळेत झाले. याच काळात कोल्हापुरात नक्षलवादाच्या समर्थनार्थ काही बॅनर झळकल्यामुळे त्याच्यासोबत राहणारे काही जण पोलीस तपासाच्या फेऱ्यात अडकले, त्यामुळे त्याला शाळा बदलावी लागली.
अकरावी ते सेकंड इयरपर्यंतचे शिक्षण मुंबईतील रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये झाले. त्या काळात तो आपल्या काही सहकाऱ्यांसह घाटकोपर पूर्व भागात राहत होता. तरुणपणात आलेल्या विकासवर नक्षलवाद्यांनी समविचारी तरुणांना संघटित करण्याची आणि त्यांची मानसिकता पारखून त्यांना सशस्त्र नक्षलवादाकडे वळवण्याची जबाबदारी सोपवली होती. सरकारविरोधात रोष असलेल्या विद्यार्थ्यांना हळूहळू चळवळीकडे आणण्याचे काम आपण करत होतो, अशी कबुली त्याने दिली. मुंबईत तरुणांना संघटित करण्याच्या कामात तो यशस्वी ठरल्यामुळे नक्षलवाद्यांनी बहुधा पहिल्यांदाच आपल्या घटनेत बदल करून पक्षात कोणतेही पद देण्यासाठीचे वय 18 वरून 16 वर्षे केले. हा बदल केवळ मुंबईतील विकासच्या कामामुळेच करण्यात आला होता. घटनेत बदल केल्यानंतर नक्षलवाद्यांनी 16 वर्षांच्या विकासला त्यांच्या मुंबई एरिया कमिटीत स्थान दिले.
दरम्यान, 2001 साली जंगलात कार्यरत असलेले विकासचे वडील सायन्ना उर्फ भास्कर रामास्वामी आणि आई गंगालक्ष्मी रामास्वामी यांनी तेलंगणात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आई-वडिलांच्या चौकशीतून आपण मुंबईत शिक्षण घेत असल्याचे उघड होईल आणि पोलीस आपल्याला पकडतील, या भीतीने विकासने 2002 साली मुंबई सोडली. मुंबई सोडल्यानंतर काही काळ तो नागपुरातही कार्यरत राहिला, अशी माहिती त्याने दिली आहे.