पुण्यात अमली पदार्थ विरोधी पथकांकडून चौघांना अटक, ११२ ग्रॅम एमडी आणि ६ किलो गांजा जप्त
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एक आणि दोन यांनी वेगवेगळ्या कारवायांत चौघांना अटक केली. दोन्ही कारवायांत मिळून ८ लाख ४० हजारांचा ऐवज जप्त झाला आहे.
पुणे शहरात ड्रग्जचे वितरण आणि विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्याच मोहिमेत गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एक आणि पथक दोन यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून चौघांना अटक केली आहे. एका कारवाईत ११२ ग्रॅम एमडी, तर दुसऱ्या कारवाईत ६ किलो गांजा जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांत मिळून ८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पहिली कारवाई काळेपडळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाली. अमली पदार्थ विरोधी पथक एकचे अधिकारी आणि कर्मचारी या भागात पेट्रोलिंग करत होते. त्या वेळी दोघे जण एमडी विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार अमोल सरडे यांना मिळाली. त्या माहितीनुसार पथकाने समृद्धी चौकात सापळा रचला. दोघे संशयित दिसताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
झडती घेतली तेव्हा आरोपी मुशरफ इसाक शेख याच्याकडून ५२ ग्रॅम, तर सोहेल बाबुराव शेख याच्याकडून ६० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. दोघांचे वय २५ वर्षे असून दोघेही काळेपडळ येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून दोन मोबाइल आणि एक दुचाकीही जप्त झाली. हा सगळा ऐवज ४ लाख १४ हजार रुपयांचा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या एमडीची किंमत ३ लाख ६० हजार रुपये आहे.
याप्रकरणी पोलिस हवालदार अमोल सरडे यांनी तक्रार दिली असून काळेपडळ पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोघांनी एमडी कोठून आणले आणि ते कोणाला विकणार होते, याची चौकशी पोलिस करत आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त गौहर हसन, वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक योगेश कोतकर, अमोल सरडे आणि त्यांच्या पथकाने केली.
दुसरी कारवाई स्वारगेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथक दोनने केली. पथक पेट्रोलिंग करत असताना स्वारगेट बसस्थानक परिसरात दोघे जण संशयास्पद वावरताना दिसले. त्यामुळे आशिष रमेश शिंदे आणि आशितोष उर्फ स्वप्नील सोमनाथ कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले. आशिष शिंदे २१ वर्षांचा असून आशितोष कांबळे २७ वर्षांचा आहे आणि तो बिबवेवाडीतील शिवतेजनगर येथे राहतो.
त्यांची झडती घेतल्यावर ३ लाख रुपये किमतीचा ६ किलो गांजा, रोकड आणि मोबाइल सापडला. हा ऐवज एकूण ४ लाख २६ हजार रुपयांचा आहे. गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या या दोघांना पथकाने अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक जीवन माने आणि त्यांच्या पथकाने केली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.