बुधवार, 4 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पनवेल आणि सिडको भागात नोव्हेंबरपासून 15 टक्के पाणीकपात, आठवड्यातून एक दिवस 24 तास पाणी बंद

पनवेल आणि सिडको भागात नोव्हेंबरपासून 15 टक्के पाणीकपात, आठवड्यातून एक दिवस 24 तास पाणी बंद छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागरी PT24 टीम

पावसाने यंदा पाठ फिरवल्यामुळे सिडकोच्या अखत्यारीतील भागांत नोव्हेंबरपासून 15 टक्के पाणीकपात सुरू झाली आहे. प्रत्येक विभागात आठवड्यातून एकदा 24 तास पाणीपुरवठा बंद राहील.

पनवेलसह सिडकोच्या अखत्यारीतील अनेक भागांत नोव्हेंबरपासून 15 टक्के पाणीकपात लागू झाली आहे. यंदा पाऊस अपेक्षेप्रमाणे पडला नाही, त्यामुळे राज्यातील अनेक शहरांना पाणीटंचाईचा धोका आहे. उपलब्ध पाणीसाठा पुढच्या पावसाळ्यापर्यंत पुरवायचा असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या कपातीनुसार प्रत्येक विभागात आठवड्यातून एका दिवशी सलग 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पाऊस कमी राहिला. परतीच्या पावसानेही निराशा केली आणि राज्यात अपेक्षेपेक्षा कमी पर्जन्यमान नोंदवले गेले. पावसाळ्यातच काही भागांत त्याचा परिणाम जाणवला आणि अनेक ठिकाणी पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 5 ऑक्टोबर 2026 रोजी शासन निर्णय जाहीर केला. उपलब्ध जलसाठ्यांचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या सूचना त्यात आहेत. महानगरपालिका आणि नागरिकांनी पाणी जपून वापरावे, तसेच पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही शासनाने सांगितले आहे.

शासनाच्या या निर्देशांनुसार सिडको प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे. संभाव्य टंचाई टाळण्यासाठी सिडकोच्या अखत्यारीतील विविध विभागांत 15 टक्के कपात लागू झाली आहे. नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही कपात पुढील आदेश मिळेपर्यंत कायम राहील. वेगवेगळ्या भागांसाठी स्वतंत्र वेळापत्रक ठरवण्यात आले आहे.

खारघरमध्ये दर सोमवारी 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. उलवे सेक्टर 2, 3, 5, 6, 19, 20, 22, 23, 24, 25 आणि 25-अ, तसेच गव्हाण, कोपर व मोरावे येथे मंगळवारी पाणी येणार नाही. तळोजात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहील.

उलवे सेक्टर 8, 9, 10-ब, 15-क, 16, 17 आणि 18 तसेच शेलघर, बामणडोंगरी, न्हावा, शिवाजीनगर आणि न्हावा खाडी परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. द्रोणागिरी सेक्टर 1, 2, 11, 12, 15, 30, 47, 48, 50, 51, 52, 53, 54 आणि 55 येथे, तसेच धुतुम, भेडखळ, पागोटे, फुंडे, नवघर, नवघर पाडा, बोकरडवीरा आणि कुंडे परिसरातही एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल.

नवीन पनवेल पूर्व भागात दर सोमवारी, तर नवीन पनवेल पश्चिम भागात दर मंगळवारी 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. कळंबोलीत बुधवारी, करंजाडे येथे गुरुवारी, तर कळुंद्रे आणि कामोठे येथे शुक्रवारी पाणी बंद ठेवण्यात येईल.

कपातीच्या काळात पिण्याचे पाणी अत्यंत जपून आणि फक्त गरजेपुरते वापरावे, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल. घरातील आणि गृहनिर्माण संकुलातील पाण्याच्या टाक्या भरून वाहू नयेत, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

घरातील नळ किंवा जलवाहिन्यांमधून पाणी गळत असेल तर ते लगेच दुरुस्त करून घ्यावे. गरज नसताना नळ सुरू ठेवू नयेत. साठवलेले पाणी शिळे झाले आहे, असे समजून फेकून देऊ नये. शहरातील जलतरण तलावांसाठीही पिण्याचे पाणी वापरू नये. या नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, त्यामुळे पनवेल आणि सिडको क्षेत्रातील नागरिकांनी पाणी वाया घालवू नये आणि प्रशासनाच्या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

#पुणे#शहर#PT24#Civic#Pune

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ