गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

मुंबई-पुणे महामार्गावरील हॉटेल-ढाब्यांची तपासणी करा, झिरवाळ यांच्या कार्यालयाचे आदेश

मुंबई-पुणे महामार्गावरील हॉटेल-ढाब्यांची तपासणी करा, झिरवाळ यांच्या कार्यालयाचे आदेश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
तब्येत PT24 टीम

प्रवाशांकडून अवाजवी दर घेतल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावरून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार समोर आली आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसचालक आणि महामार्गावरील काही हॉटेल-ढाबे चालवणाऱ्यांकडून हा प्रकार होत असल्याचे सांगितले जात आहे. रुग्ण हक्क परिषदेचे मंत्रालयीन सचिव एस. मुलाणी यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना लेखी निवेदन देऊन ही तक्रार केली आहे.

प्रवाशांकडून खाद्यपदार्थांसाठी अवाजवी दर घेणे, निकृष्ट दर्जाचे अन्न देणे आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा प्रकारांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. मुलाणी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडेही लेखी तक्रार केली असून, या हॉटेल-ढाब्यांवर विशेष तपासणी मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.

या निवेदनाची दखल घेऊन मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयाकडून ५ नोव्हेंबर २०२६ रोजी आदेश देण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी, असे या आदेशात म्हटल्याचे समोर आले आहे.

निवेदनात असे नमूद आहे की, मुंबईहून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांकडे दररोज मोठ्या संख्येने खासगी ट्रॅव्हल्स बस धावतात. या बस रात्री साधारण १० ते १ या वेळेत महामार्गावरील ठरावीक हॉटेल आणि ढाब्यांवरच थांबवल्या जातात. काही ठिकाणी दररोज सुमारे ३० ते ३५ ट्रॅव्हल्स बस थांबत असल्याची माहिती मिळाल्याचेही त्यात म्हटले आहे.

रात्रीच्या वेळी प्रवाशांसमोर दुसरा पर्याय नसतो. त्याचा गैरफायदा घेऊन खाद्यपदार्थांचे अवाजवी दर लावले जात असल्याच्या तक्रारी आहेत. प्रवाशांची गरज हे हॉटेल चालकांच्या नफेखोरीचे साधन बनत असेल, तर ती केवळ आर्थिक पिळवणूक नाही, तर ग्राहकांच्या विश्वासाचा उघड गैरफायदा आहे, असे सांगण्यात येत आहे.

निवेदनात काही ट्रॅव्हल्स चालक आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यात कमिशनच्या आधारे संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ठरावीक हॉटेलवरच बस थांबवण्यामागे पैशांचे व्यवहार आहेत का, प्रवाशांना दुसऱ्या हॉटेलवर उतरण्याची संधी का दिली जात नाही आणि हॉटेल चालकांकडून बसचालकांना कोणत्या स्वरूपाचे आर्थिक लाभ दिले जातात, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, असे त्यात म्हटले आहे. कमिशनचे आरोप सिद्ध झाले, तर संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशीही मागणी आहे.

महामार्गावरील काही हॉटेल आणि ढाब्यांमधील अन्नपदार्थांचा दर्जा, स्वयंपाकघरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आणि खाद्यपदार्थांची साठवण याबाबत गंभीर तक्रारी येत असल्याचे निवेदनात नमूद आहे. मुलाणी यांनी अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष तपासणीची मागणी केली आहे. त्यात अन्नपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणे, स्वच्छता आणि अन्नसुरक्षा परवान्यांची पडताळणी, खाद्यपदार्थांचे दरपत्रक तपासणे, बिल देण्याच्या पद्धतीची चौकशी आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची तपासणी यांचा समावेश आहे.

मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ तपासणीचे निर्देश दिल्याची नोंद निवेदनावर करण्यात आली आहे. मात्र, यानंतर प्रत्यक्षात किती हॉटेल आणि ढाब्यांची तपासणी झाली, किती अन्न नमुने घेतले, किती ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळले आणि किती व्यावसायिकांवर कारवाई होणार, हे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर समजेल. प्रशासन फक्त कागदावर आदेश देऊन थांबणार की प्रत्यक्ष कठोर कारवाई करणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

#पुणे#सेहत#PT24#Health#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ