दिवाळीला गावी जाण्याचा प्लॅन? नियमित गाड्यांसह स्पेशल ट्रेनचेही आरक्षण फुल्ल, प्रवाशांचे टेन्शन वाढले
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेचे तिकीट मिळवताना अडचणी येत आहेत. विशेष गाड्यांनाही वेटिंग असून या गाड्यांना पिंपरी आणि चिंचवड स्थानकांवर थांबा नाही.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जायचे ठरवलेल्या प्रवाशांना रेल्वेचे तिकीट मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुतांश मार्गांवरील नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. अनेक गाड्यांची तिकिटे वेटिंगवर आहेत.
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या मार्गांवर विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. पण या विशेष गाड्यांचेही आरक्षण भरत चालल्याने प्रवाशांचे टेन्शन आणखी वाढले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातून शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये हे लोक कुटुंबासह गावी जाणे पसंत करतात. रेल्वेचा प्रवास कमी खर्चाचा आणि सुरक्षित असल्याने प्रवासी रेल्वेलाच पसंती देतात. मात्र सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढते आणि आरक्षण मिळवणे कठीण होते.
यंदा ५ नोव्हेंबरपासून दिवाळीचा सण सुरू होत आहे. त्यामुळे लोक आधीपासूनच तिकिटाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. पण बहुतांश गाड्यांचे आरक्षण उपलब्ध नसल्याने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा विचार करावा लागत आहे.
दिवाळी आणि छठपूजेनिमित्त रेल्वे प्रशासनाने पुणे, खडकी आणि हडपसर स्थानकांवरून वेगवेगळ्या मार्गांवर विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. हडपसर-मुजफ्फरपूर, हडपसर-गाझीपूर, हडपसर-नागपूर, पुणे-अमरावती, पुणे-दाणापूर, हडपसर-प्रयागराज, पुणे-मुजफ्फरपूर आणि इतर मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.
मात्र या विशेष गाड्यांना पिंपरी आणि चिंचवड स्थानकांवर थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी पुणे, खडकी किंवा हडपसर स्थानकात जावे लागणार आहे. यामुळे या भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
प्रवाशांसाठी तत्काळ आरक्षणाची सोयही उपलब्ध आहे. गाडी सुटण्याच्या एक दिवस आधी वातानुकूलित श्रेणीच्या तिकिटांसाठी सकाळी १० ते ११ आणि स्लीपर श्रेणीच्या तिकिटांसाठी सकाळी ११ ते १२ या वेळेत आरक्षण करता येते. तरीही या सोयीतून तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांना खूप धडपड करावी लागत आहे.
याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा म्हणाले, "दिवाळी आणि छठपूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे, खडकी आणि हडपसर या रेल्वे स्थानकांवरून विविध मार्गांवर विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत."
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.