अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबाची पहिली दिवाळी सुनी, राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट
अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही. राजेंद्र पवार यांनी पोस्ट लिहून जुन्या आठवणी जागवल्या, तर रोहित पवार मराठवाड्यात दुष्काळ दौऱ्यावर आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा पवार कुटुंब दिवाळी साजरी करणार नाही. त्यामुळे दरवर्षीसारखे सगळे जण एकत्र येणार नाहीत. त्यातच राज्यात दुष्काळ असल्याने रोहित पवार सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
अशा वेळी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी अजितदादांसाठी एक खास पोस्ट लिहिली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. अजित गेल्यानंतर पहिल्यांदाच दिवाळी सुनी सुनी वाटत आहे, अशी भावना त्यांनी सोशल मीडियावरील या पोस्टमधून व्यक्त केली. अजित पवार आणि बारामती यांच्या जुन्या आठवणीही त्यांनी या पोस्टमध्ये सांगितल्या. पोस्टनंतर त्यांनी या विषयांवर आणखी भाष्य केले.
राजेंद्र पवार म्हणाले, "यावर्षी अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंब दिवाळी साजरी करणार नाही. पोस्टमध्ये जे काही व्यक्त करायचे होते, ते झाले आहे. तीन वर्षांपूर्वी रोहित पवार यांनी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यावेळी दुष्काळ नव्हता. तरीही ती दिवाळी आम्ही सगळ्या कुटुंबाने आदिवासींसोबत साजरी केली. आता मात्र भयानक दुष्काळ पडला आहे. त्या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी शब्दांनी दुष्काळ हटणार नाही, पण त्यांना आधार देणे गरजेचे आहे. अजितदादांसोबतच्या असंख्य आठवणी आहेत. दिवाळी आली की वेगळ्या आठवणी येतात. शिक्षणाच्या बाबतीत वेगळ्या आणि राजकारणाच्या बाबतीत वेगळ्या आठवणी असतात."
कुटुंबाच्या एकत्र येण्याबद्दल त्यांनी सांगितले की, त्यांच्या आजींचा एक शिरस्ता होता. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचे दोन काका पुण्यात राहत होते, तर अजितदादांचे वडील बारामतीत असायचे. तरीही सुख असो वा दुःख, कोणताही सण किंवा समारंभ असो, सगळ्यांनी एकत्र यायचे, हा आजींचा शिरस्ता होता. म्हणूनच दिवाळीला सगळे एकत्र येत होते.
विलीनीकरणाच्या चर्चांबद्दल राजेंद्र पवार म्हणाले की, काल परवा पवार साहेब आजारी असताना हॉस्पिटलमध्ये अशा चर्चा झाल्या. रोहित पवार विदर्भ आणि मराठवाड्यात फिरत आहेत आणि आम्ही बारामतीत आहोत, त्यामुळे या चर्चांमध्ये काय झाले, हे आपल्याला माहिती नाही. त्या झाल्या असल्या तरी पक्षाचे प्रमुख आणि नेते मंडळी त्याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
रोहित पवार करत असलेल्या दुष्काळ दौऱ्याबद्दलही राजेंद्र पवार बोलले. ते चांगले काम करत आहेत, लोकांसाठी काम करण्याची त्यांनी केलेली निवड योग्य आहे, असे ते म्हणाले. लोकांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हेच त्यांचे काम आहे. उद्या सत्तेत आल्यानंतर कोणत्या अडचणी असतात, हे त्यांना समजले, तर ते नक्कीच प्रश्न सोडवण्याची व्यवस्था करतील, असेही त्यांनी पुढे सांगितले.


कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.